Saturday, April 27, 2024
Homeनगरदूधगंगा पतसंस्थेचे ठेवीदार आंदोलनाच्या तयारीत

दूधगंगा पतसंस्थेचे ठेवीदार आंदोलनाच्या तयारीत

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक अपहारामुळे वादग्रस्त ठरलेल्या येथील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांना मुदत संपूनही ठेवीचे पैसे मिळत नसल्याने ठेवीदारांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

ठेवीची रक्कम देण्यास विलंब केल्यास ठेवीदार संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली दि. 26 जानेवारीपासून आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा विशेष लेखापरीक्षकांकडून पतसंस्थेचे ऑडिट करण्यास विलंब लावला जात असल्याने सभासदांमधून संताप व्यक्त केला जात आहे. 1991 साली स्थापन झालेल्या दूधगंगा पतसंस्थेने अल्पावधीत प्रगती केली होती. पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांच्या नेतृत्वाखाली या पतसंस्थेचे देदिप्यमान कामगिरी केली होती.

मात्र या कामगिरीला 2001 साली ओहोटी लागली. त्यावर्षी या पतसंस्थेमध्ये अपहार झाल्याची चर्चा झाली होती. मात्र अध्यक्षांनी कुशलतेने हे प्रकरण हाताळले होते. तब्बल 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा पतसंस्थेत मोठा अपहार झाल्याचे उघड झाले आहे. पाच महिन्यांपूर्वी या पतसंस्थेला अचानक टाळे लावण्यात आल्याने पतसंस्थेत अपहार झाल्याचे अध्यक्षांना जाहीर करावे लागले होते. अपहरणाचे खापर पतसंस्थेचे व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ व इतर कर्मचार्‍यांवर फोडून त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात व जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करण्यात आली होती.

या पतसंस्थेमध्ये शंभर कोटीहून अधिक रुपयांच्या ठेवी ठेवीदारांनी ठेवलेल्या आहेत. आर्थिक अपहरणामुळे पतसंस्था अडचणीत सापडलेली आहे. मुदत संपूनही ठेवीचे पैसे परत देण्यास संचालक मंडळ अपयशी ठरत आहे. यामुळे ठेवीदारांमधून संताप व्यक्त केला जात आहे. ठेवीदारांच्या संरक्षणासाठी ठेवीदार संघर्ष समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. पतसंस्था चालकांनी ठेवींबाबत त्वरीत निर्णय घेऊन ठेवींची रक्कम न दिल्यास मोठे आंदोलन उभे राहण्याची चिन्हे आहेत. संघर्ष समितीच्या वतीने तसा इशाराही देण्यात आलेला आहे.

दूधगंगा पतसंस्थेमध्ये आर्थिक अपहार झाल्याची तक्रार जिल्हा सहकारी निबंधकाकडे गेल्यानंतर त्यांनी या पतसंस्थेचे मागील पाच वर्षांचे फेर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. पाच महिन्यांचा कालावधी उलटूनही या पतसंस्थेचे ऑडिट अद्याप झालेले नाही, यामुळे सभासदांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान या ऑडिट संदर्भात जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 श्री. निकम यांच्याशी संपर्क साधला असता पतसंस्थेचे चार वर्षांचे ऑडिट झाले असून उर्वरित वर्षाचे ऑडिटही लवकरच पूर्ण केले जाईल असे त्यांनी सांगितले. या पतसंस्थेमध्ये आठ ते दहा वर्षांपासून आर्थिक अपहार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे मागील वर्षांचे ही ऑडिट करावे लागणार आहे. शासनाची कामे आम्हाला प्राधान्याने करावी लागतात. हे काम करून ऑडिटचेही काम आम्ही करत आहोत. दूधगंगा पतसंस्थेतील कर्ज प्रकरणे यांचा अभ्यास करावा लागणार आहे. सर्व माहिती गोळा करून डाटा एक्सपर्टच्या माध्यमातून अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल, असे निकम यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या