Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारट्रॅक्टरखाली दबून चालकाचा मृत्यू

ट्रॅक्टरखाली दबून चालकाचा मृत्यू

शहादा – Shahada – ता.प्र :

तालुक्यातील मामाचे मोहिदा येथे शेतात ट्रॅक्टर पलटी होऊन चालक त्याखाली दबल्या गेल्याने जागीच ठार झाला. ही घटना शेतकर्‍याने त्याच्या कुटुंबियांना उशिरा कळवल्याचा राग येऊन संतप्त जमावाने रात्री दहा ते अकरा वाजता शेतकर्‍याच्या घरावर हल्ला करून तुफान दगडफेक केली.

- Advertisement -

समोरूनही अन्य समाजाचा जमाव चालून आल्याने गावात दंगलीचे वातावरण पसरले. वेळीच पोलीस आल्याने मोठी दंगल टळली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. गावात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून रात्रीच दंगा काबू पथकाची तुकडी तैनात करण्यात आली आहेी.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोना चंद्र चव्हाण (वय 19) हा गावातील शेतकरी अंबालाल जगन्नाथ पाटील यांच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करत होता. तो 14 जून रोजी शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करत होता. त्यावेळी ट्रॅक्टर पलटी होऊन त्याखाली दबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना काल दि.14 रोजी घडली. मात्र, रात्री उशिरापर्यंत सोना चंद्र चव्हाण हा घरी परत न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी शेतात जाऊन बघितले असता तो ट्रॅक्टर खाली दबला होता. त्याला बाहेर काढण्यात आले. उशिरा रात्री दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान शेतकर्‍याने मयत सोना चव्हाण याच्या घटनेची माहिती कळवल्याने लोकांचा जमाव शेतकरी अंबालाल जगन्नाथ पाटील याच्या घरावर चाल करून आला व तुफान दगडफेक केली.

घरातील सामानाची तोडफोड करून घरातील लोकांना मारहाण करण्यात आली. त्यात अंबालाल जगन्नाथ पाटील हे जखमी झाले आहेत. हा सारा प्रकार बघता दुसर्‍या बाजूने शेतकर्‍यांच्या मदतीसाठी जमाव चालून आला. दोन्ही जमाव आमने-सामने झाल्यानंतर दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली.

पोलीस घटनास्थळी वेळेवर दाखल झाल्याने दंगल आटोक्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला. यावेळी पोलिसांच्या गाडीवरही जमावाने दगडफेक केल्याने गाडीचे नुकसान झाले. गावात शांतता असून शहादा, म्हसावद व सारंगखेडा येथील ज्यादा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

दोन्ही गटातील लोकांना शांततेचे आवाहन केले आहे. आज अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार उपविभागीय पोलिस अधिकारी संभाजी सावंत यांनी मोहिदा गावात भेट देऊन शांततेचे आवाहन केले.

शहादा पोलिसात अंबालाल जगन्नाथ पाटील यांच्या फिर्यादीवरून वीस ते पंचवीस आरोपींच्या विरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मयत सोना चंद्र चव्हाण याच्यावर म्हसावद ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून शव त्याच्या परिवारांचा ताब्यात देण्यात आले. गावात शांतता आहे. पुढील तपास स्वतः पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या