Saturday, April 27, 2024
Homeनगरगोदावरी कालव्यातून पिण्याचे व सिंचनाचे आवर्तन तात्काळ सोडावे

गोदावरी कालव्यातून पिण्याचे व सिंचनाचे आवर्तन तात्काळ सोडावे

राहाता / अस्तगाव (वार्ताहर)

गोदावरी कालव्यातून पिण्यासाठी व सिंचनासाठी तात्काळ आवर्तन सोडावे, अशी मागणी राहाता तालुक्यातील गोदावरी कालवा पाणी बचत कृती समितीने निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisement -

जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आ. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा विभाग नाशिक यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, गोदावरी कालवे लाभक्षेत्रात यावर्षी अतिशय अल्प जेमतेम २२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. परिसरात प्रचंड दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पिण्याचे तलाव, विहिरी, बोअरवेलने तळ गाठला आहे. पिण्यासाठी तसेच शेती सिंचनासाठी पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. चालूवर्षी खरीप हंगामासाठी पाणी मिळावे म्हणून वेळोवेळी पाण्याची मागणी करुन देखील गोदावरी कालव्यातून सिंचनासाठी पाणी मिळालेले नाही. त्यामुळे लाभक्षेत्रातील फळबागा, चारा पिके, पशुधन पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

मेंढेगिरी समितीच्या शिफारसीचा बागुलबुआ दाखवून लाभक्षेत्राला पाणी नाकारू नये. गोदावरी कालव्यांना खरीप हंगामात मूळ प्रकल्प नियोजनाप्रमाणे धरणातील पाणीसाठा ३० टक्के झाल्यावर आवश्यकता असल्यास म्हणजेच लाभक्षेत्रात आवर्षण प्रवण परिस्थिती असल्यास किंवा पावसाची दीर्घकाळ उघडीप असल्यास खरीप पिकाला पाणी देता येते. सध्या गंगापूर व दारणा धरण समुहात ८० टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या लाभक्षेत्रात दुष्काळी परिस्थिती आहे.

समन्यायी कायदा झाल्यानंतर त्यात मेंढेगिरी अहवालातील पर्यायांची नोंद घ्यावी लागते. पहिल्या पर्यायात जायकवाडीमध्ये २८ टीएमसी म्हणजेच ३७ टक्के पाणीसाठा होत नाही तोपर्यंत पिकांसाठी पाणी सोडता येत नाही. मात्र २८ टीएमसी म्हणजेच ३७ टक्के पाणीसाठा झाला असेल तर एकूण खरीप क्षेत्राच्या ८० टक्के खरीप क्षेत्राला पाणी देता येते.

आज रोजी जायकवाडी जलाशयात पाणीसाठा ४५ टक्केपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजेच जवळपास ३५ टीएमसीपेक्षा अधिक पाणीसाठा जायकवाडी जलाशयात उपलब्ध आहे. तसेच जायकवाडी जलाशयात पैठण व शेवगाव तालुक्यातून ६००० क्युसेकपेक्षा अधिक वेगाने पाण्याचा वेग येत आहे. मेंढेगिरी समितीच्या अनुषंगाने पर्याय क्र. २ जायकवाडीत ४१.५ टीएमसी ५४ टक्के पाणीसाठा झाल्यावर खरिपाच्या एकूण क्षेत्राच्या ८० टक्के तसेच रब्बीच्या एकूण क्षेत्राच्या ३२ टक्के क्षेत्राला पाणी सोडता येते. याप्रमाणे आपण कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

मेंढेगिरी समितीच्या बहुचर्चित पर्याय क्र. ३ म्हणजेच जोपर्यंत जायकवाडीतील पाणीसाठा ६५ टक्के म्हणजे ५० टीएमसी होत नाही तोपर्यंत नगर नाशिकमध्ये खरीप पिकांना पाणी देऊ नये. या पर्यायाचा वापर करू नये. हा पर्याय मराठवाड्यामध्ये अतिशय भीषण दुष्काळी परिस्थिती असेल तर जायकवाडीतील पाणीसाठा २८ टीएमसी पेक्षा कमी किंवा ३७ टक्केपेक्षाही कमी असेल तरच वापरावा. परंतु आपण सर्वसामान्य परिस्थितीत आजपर्यंत मेंढेगिरी समितीतील पर्याय क्र. ३ हा वापरून उर्ध्व धरण लाभक्षेत्राला खरीप हंगामात कायमस्वरुपी पाणी नाकारून अन्याय करत आहात.

कृपया मेंढगिरी समितीच्या वरील दोन पर्यायांचा अवलंब करून किंवा प्रकल्पीय अहवालातील तरतुदीप्रमाणे गोदावरी कालवे लाभक्षेत्राला तातडीने पाणी देण्यात यावे अन्यथा गोदावरी कालवे संघर्ष समितीतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल.

या निवेदनावर गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ, व्हाईस चेअरमन प्रतापराव जगताप, नितीन कापसे, राजेंद्र कार्ले, रावसाहेब गाढवे, सुनील सदाफळ, संजय सदाफळ, अॅड. विजय सदाफळ, राजेंद्र रोहोम, बाळासाहेब दंडवते. नानाभाऊ भुजबळ, संजय बोठे, अविनाश टिळेकर, संजय चोळके, गुलाबराव खापटे, राजेंद्र दंडवते, प्रदीप कोल्हे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या