Saturday, April 27, 2024
Homeनगरनगरकरांनो पाणी उकळून प्या : महापौर

नगरकरांनो पाणी उकळून प्या : महापौर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात नवीन पाण्याची आवक सुरू आहे.

- Advertisement -

नव्याने आवक झाल्याने हे पाणी गढूळ आहे. त्यादृष्टीने महानगरपालिकेमार्फत विळद जलशुध्दीकरण प्रकल्प व वसंत टेकडी जलकुंभ येथे तुरटी व क्लोरीनची मात्रा वाढवण्यात आलेली आहे.

परंतु जलशुध्दीकरण प्रक्रियानंतरही नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे जलजन्य आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, तसेच नळांना तोट्या बसवाव्यात असे, आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे व आयुक्त मायकलवार यांनी केले आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असून या दिवसांमध्ये रस्त्यावरून वाहणारे पाणी नागरिकांच्या उघड्या असलेल्या हौदामध्ये जमा होते. हौदामध्ये जमा झालेले पाणी तोट्या नसलेल्या नळ कनेक्शनद्वारे वितरण व्यवस्थेच्या जलवाहिनीमध्ये जाते व तेच पाणी, पाणी वाटपाच्यावेळी नळ कनेक्शनमधून येते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसामध्ये घाण पाण्याच्या तक्रारी वाढत असतात.

तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन त्यांच्या नळ कनेक्शनला तोट्या बसवून घ्याव्यात. जेणेकरून पिण्याचे पाणी वाया जाणार नाही व नागरिकांच्या घाण पाण्याच्या तक्रारीही काहीअंशी कमी होतील. तसेच पिण्यासाठी वापरावयाचे पाणी उकळून घ्यावे. त्यामुळे जलजन्य आजार होणार नाहीत.

आधीच करोनाचा प्रादुर्भाव शहरात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेऊन पाणी उकळून प्यावे व नळांना तोट्या बसवाव्यात त्यामुळे पाण्याचा अपव्यय होणार नाही, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या