कोपरगावच्या नाट्यगृहावरून रंगले राजकीय नाट्य

jalgaon-digital
3 Min Read

आमदारांनी नाट्यरसिकांना बंदिस्त नाट्यगृहापासून वंचित ठेवले – स्नेहलता कोल्हे

कोपरगाव (प्रतिनिधी) – नाटय रसिकांच्या आग्रहाखातर कोपरगावकरांसाठी आधुनिक बंदिस्त नाट्यगृह व्हावे म्हणून तत्कालीन नगरविकास मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून बंदिस्त नाट्यगृहासाठी निधी व जागा मिळावी म्हणून मागणी केली होती. त्यानुसार नाट्यगृहासाठी 2 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला तसेच पाटबंधारे विभागाची एक एकर जागाही दिली. परंतु मतदार संघाचा विकास करीत असल्याच्या फक्त वल्गना करणार्‍या आमदारांनी नाट्यगृृहाचा निधी दुसरीकडे वळवून कोपरगावकरांना नाट्यगृहापासून वंचित ठेवण्याचे काम केले, अशी टीका भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, स्नेहलता कोल्हे यांनी केली. इरिगेशन बंगल्याजवळील पाटबंधारे विभागाची जागाही या बंदिस्त नाट्यगृहासाठी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार कोपरगाव शहरात आधुनिक नाट्यगृहास जलसंपदा विभागाच्या मालकीची एक एकर जागा हस्तांतरीत करणे व करारनामा करून घेणेबाबत उपविभागीय अभियंता,गोदावरी डावा तट कालवा, उपविभाग, कोपरगाव यांनी कोपरगाव नगरपरिषदेस कळविले होते. वास्तविक अथक परिश्रम करून आपण बंदिस्त नाट्यगृहासाठी निधी मंजूर करून आणला, तसेच जागाही उपलब्ध करून दिली, फक्त जागा ताब्यात घेऊन काम सुरू करणे बाकी असताना सदरचा निधी अन्यत्र वळवून बिले काढण्यासाठीचाच विरोधकांनी हा खटाटोप केला असल्याचे सौ. कोल्हे म्हणाल्या. परंतु राजकीय द्वेषापोटी श्रेय मिळू नये म्हणून हे काम प्रलंबित ठेवून त्यासाठीचा मंजूर असलेला निधी पळविण्याचे काम करून कोपरगावच्या नाट्यरसिकांचा भ्रमनिरास केला असल्याची खंतही सौ.कोल्हे यांनी व्यक्त केली.

नाट्य रसिकांबद्दल कळवळा दाखविणार्‍यांनी खुले नाट्यगृहाचे काम नामंजूर केले : नगराध्यक्ष वहाडणे

कोपरगाव (प्रतिनिधी) – नाट्य रसिकांबद्दल खोटा कळवळा दाखविणार्‍यांनी बहुमताच्या जोरावर नुकतेच खुले नाट्यगृह नूतनीकरण काम नामंजूर केलेले आहे. नाट्यगृहाचा निधी मी माझ्या घरासाठी वापरणार नसून तुम्ही अर्धवट निधी आणून घाईघाईने कोनशीला लावलेल्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठीच वापरणार आहे, असा थेट आरोप नगराध्यक्ष वहाडणे यांनी केला आहे.

नगराध्यक्ष वहाडणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, बंदिस्त नाट्यगृह व्हावे यासाठी मी अनेक वेळा माजी मंत्री विनोद तावडे यांना भेटून निधीची मागणी केली. 2 कोटी रुपये वैशिष्ट्यपूर्ण निधी मंजूर झाला. जागा बंदिस्त नाट्यगृहासाठी मिळावी, अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेने पाटबंधारे विभाग यांचेकडे केली. सर्वसाधारण सभेत तसा ठरावही केला. वारंवार मागणी-पाठपुरावा करूनही करारनामा मसुदा-भाडेपट्टा आकारणी दर उपलब्ध होत नाही म्हणून त्यावेळी आ.कोल्हे यांना यात लक्ष घालण्यासाठी विनंती केली होती. आ.आशुतोष काळे व पाटबंधारे विभागासोबत झालेल्या बैठकीत सर्वे नं.237 ऐवजी स.नं.1935 व 1939 जागेपैकी एक एकर क्षेत्रात सुसज्ज नाट्य करावे, असा निर्णय झाला. पाटबंधारे विभाग,नाशिक यांनी 30 वर्षाचे भाडे कराराने जागा हस्तांतरण व 5 वर्षाचे जागा आगाऊ भाडेपट्टा बाबत पत्र दिले. पण 2017-18 चा मंजूर निधी.31 मार्च आधी खर्च न झाल्यास निधी परत जाण्याचा धोका होता.म्हणून हा मंजूर निधी कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी वळविण्यात यावा असे शासनास कळविले. तसे पत्र नगरविकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनाही दिले. नगर येथील बैठकीत मी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व प्रधान सचिव पाठक यांच्याकडेही हा निधी परत जाऊ न देता प्रशासकीय इमारत बांधकासाठी वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. मी, मुख्याधिकारी व आ.काळे यांनी प्रयत्न केल्यानेच 2 कोटी निधी परत गेलेला नाही, असेही वहाडणे यांनी म्हटले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *