Thursday, April 25, 2024
Homeनगरडॉ.वंदना मुरकुटे यांचा सभापतीपदाचा मार्ग मोकळा

डॉ.वंदना मुरकुटे यांचा सभापतीपदाचा मार्ग मोकळा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

औरंगाबाद खंडपिठाने श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती पदाचा निकाल जाहीर करण्याचे आदेश दिल्याने डॉ. वंदना मुरकुटे यांचा सभापतीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisement -

जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी 18 नोव्हेंबर रोजी पंचायत समितीच्या सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्या विरोधात पंचायत समितीचे सदस्य दीपक पटारे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात पिटीशन दाखल करून निवडणूक कार्यक्रमावर आक्षेप घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ओबीसी आरक्षण हे क्षमतेपेक्षा अधिक असल्याने निकाल जाहीर करण्यासंदर्भात स्थगिती मिळवली होती. खंडपिठाचे न्यायमूर्ती श्री. गंगापूरवाला व न्यायमूतीर्र् श्री. लढ्ढा यांचेसमोर सदर अपीलावर युक्तीवाद झाला. त्यानंतर न्यायालयाने श्री. पटारे यांचे अपील फेटाळून लावत सभापती पदाचा निकाल जाहीर करण्यासंदर्भात आदेश केले.

पंचायत समितीच्या सभापती संगिता शिंदे यांना अपात्र ठरविण्यात आल्यानंतर 18 नोव्हेंबर रोजी सभापती निवडीची प्रक्रीया पार पडली. सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी आरक्षित असल्याने काँग्रेसच्या डॉ. वंदना मुरकुटे या पदाच्या दावेदार होत्या. शिंदे यांच्या अपात्रतेसाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. सर्व प्रक्रियेतून गेल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी या पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यास विखे गटाचे माजी सभापती दीपक पटारे यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. पंचायत समितीत 50 टक्क्यापेक्षा अधिकचे आरक्षण असून इतर मागासवर्गीय 27 टक्के आरक्षणाची मर्यादा असताना त्यापेक्षा अधिक आरक्षण दिल्याचे आपल्या याचिकेत नमूद केले होते. याप्रकरणी खंडपीठाने निवडणूक प्रक्रिया घेण्यास मान्यता देत निकाल जाहीर करण्यास मनाई केली. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल पवार, सहाय्यक तथा गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांच्या उपस्थितीत दि. 18 नोव्हेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली.

यावेळी काँग्रेसच्यावतीने डॉ. वंदना मुरकुटे यांनी दोन व विखे गटाच्यावतीने कल्याणी कानडे, वैशाली मोरे यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कल्याणी कानडे यांच्यावतीने अ‍ॅड. आर. डी. जोंधळे तर वैशाली मोरे यांच्यावतीने अ‍ॅड. एस. बी. काकड यांच्यामार्फत्त पंचायत समितीत 50 टक्क्यांपेक्षा अधिकचे आरक्षण असून इतर मागासवर्गीय 27 टक्के आरक्षणाची मर्यादा असताना त्यापेक्षा अधिक आरक्षण दिल्याने सदरचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरावा, असा अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना दिला. सदरचे दोन्ही उमेदवारी अर्ज अन्य प्रवर्गातील असून हे इतर मागास महिला प्रवर्गाचे नसल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले तर वंदना मुरकुटे या इतर मागास प्रवर्गातून निवडून आल्या असून त्यांनी जातीचे दाखल्यासह सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असून त्यांचा एकमेव अर्ज वैध ठरविण्यात आला असल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी सांगितले.

उच्च न्यायालयाने निवडणूक कार्यक्रम घेण्यास मनाई केलेली नसल्याने आजची प्रक्रिया पूर्ण केल्याचे सांगून न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुकीचा निकाल राखीव ठेवण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतधिकारी अनिल पवार यांनी स्पष्ट केले होते. मुरकुटे यांच्यावतीने अ‍ॅड. अजित काळे व अ‍ॅड. समीन बागवान, अ‍ॅड. साक्षी काळे यांनी काम पाहिले.

काल उच्च न्यायालयाने सभापती पदाचा निकाल जाहीर करण्याचे आदेश दिल्याने आता जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी निकाल जाहीर करतील, असे डॉ. मुरकुटे यांचे वकील अ‍ॅड. अजित काळे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या