डॉ. तनपुरे कारखान्यावर प्रशासक मंडळ नियुक्त

jalgaon-digital
3 Min Read

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara

राहुरी तालुक्याची कामधेनू असलेल्या डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे कामकाज पाहण्यासाठी प्राधिकृत अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश प्रादेशिक सहसंचालक मिलिंद भालेराव यांनी दिले. त्यानुसार प्राधिकृत अधिकार्‍यांनी कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक बी. एन. सरोदे यांच्याकडून पदभार घेण्याची प्रक्रिया काल मंगळवार दि.21 मार्च रोजी दुपारपर्यंत सुरू होती.

कारखान्याचे मुख्य प्राधिकृत अधिकारी म्हणून गणेश पुरी (जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था) तर प्राधिकृत अधिकारी म्हणून देविदास घोडेचोर, (सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था जामखेड) व प्रकाश सैंदाणे (उपलेखा परिक्षक, सहकारी संस्था) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील बारा महिन्याच्या कालावधीसाठी प्राधिकृत अधिकारी तनपुरे कारखान्याचे कामकाज बघणार आहेत.

डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचा कालावधी संपलेला आहे. तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरु करावयाची असल्याने निवडणुकीसाठी आवश्यक असणारा निवडणूक निधी 32 लाख रुपये राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे या निवडणूक निधी खात्यात निधीचा भरणा करणेबाबत कळविण्यात आले आहे.

हंगाम 2021-22 चे ऊस पुरवठादार शेतकर्‍यांचे अजून पेमेंट देणे बाकी आहे. इतर व्यापारी बँकांची देणी देणे बाकी आहे. कारखान्याची संलग्न संस्था श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाकडे कोणताही निधी उपलब्ध नाही. शिक्षण संस्थेमधील कामगारांची देणी देण्याकरीता जमीन विक्रीचा प्रस्ताव चालू आहे. कारखान्याकडे कोणताही निधी उपलब्ध नसल्यामुळे निवडणूक खर्चाकरीता रक्कम कारखान्याकडे उपलब्ध नाही असे कळविले आहे. त्यामुळे कारखान्याने निवडणुकीसाठी आवश्यक तो निवडणूक निधी भरणा करण्यास असमर्थता दर्शविल्याने जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांना निवडणूक निधी अभावी सदर कारखान्याची निवडणूक पार पाडता येत नाही.

कोणत्याही संस्थेच्या समितीचा किंवा तिच्या कोणत्याही सदस्याचा पदावधी संपला म्हणून किंवा इतर कोणत्याही कारणासाठी निवडणूक घेण्यात आली व त्यावेळी रिकाम्या जागा भरण्यासाठी आवश्यक असलेले सर्व किंवा कोणतेही सदस्य निवडण्यात कसूर झाली आहे; आणि दुसर्‍या परंतुकानुसार सदर प्रकरणी त्वरीत कारवाई करणे आवश्यक आहे, अशी निबंधकाची खात्री झाल्यास अशा परिस्थितीत निबंधकास कोणत्याही प्रकारची नोटीस बजावणे आवश्यक नाही अशी तरतूद आहे.

सहकार कायद्यान्वये अनिवार्य असणारी निवडणूक प्रक्रिया राबविणेबाबत आवश्यक तो निवडणूक निधी भरणे बंधनकारक असताना असा निधी भरण्यास कारखाना अपयशी ठरला आहे. त्यामुळे जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) अहमदनगर हे कारखान्याची पुढील निवडणूक प्रक्रिया राबवू शकत नाहीत. तसेच निवडणूक प्राधिकरणाकडील आदेशानुसार उक्त कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया पार पाडता येत नाही. त्यामुळे सहकार कायदा कलम 77-म (1) (4) (ळळ) मधील तरतुदीनुसार कारखान्यावर प्राधिकृत अधिकारी नियुक्तीबाबतचे आदेश साखर प्रादेशिक सहसंचालक मिलिंद भालेराव यांनी काढले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *