Friday, April 26, 2024
Homeनगरपत्रकार परिषदा घेऊन डॉ. तनपुरे कारखाना ताब्यात घेण्यासाठी खटाटोप

पत्रकार परिषदा घेऊन डॉ. तनपुरे कारखाना ताब्यात घेण्यासाठी खटाटोप

उंबरे |वार्ताहर| Umbare

डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना ताब्यात घेण्यासाठी पत्रकार परिषदा घेऊन चाललेला खटाटोप हा योग्य नसून ज्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या, त्यांनी पुढे यावे, त्यांना संचालक म्हणून कारखान्यात यायचे असेल तर त्यांनी यादी पाठवावी, आम्ही बिनशर्त त्यांच्या ताब्यात कारखाना देतो, त्यांच्या वडिलांचे या कारखान्याला नाव आहे, त्यांनी पण या कारखान्याचं नेतृत्व केलं आहे. लोकप्रतिनिधींनी आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते यांचे नाव रोशन करण्यासाठी त्यांच्या नातवाने अर्थात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कारखाना चालवण्यास घ्यावा व आजोबांचा नावलौकीक राज्यात करावा, अशी घणाघाती टीका खा. डॉ. सुजय विखे यांनी केली.

- Advertisement -

डॉ. तनपुरे कारखान्याची 67 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी कारखान्याच्या गोडाऊनमध्ये संपन्न झाली.सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यमान अध्यक्ष नामदेवराव ढोकणे होते. यावेळी खा.डॉ. सुजय विखे बोलत होते.

खा. विखे म्हणाले, माझ्याकडे 5 वर्षांची जबाबदारी दिली होती, ती 6 वर्षे पार पाडली आहे. कामगारांचा न्यायालयात निकाल लागला.जमीन विक्रीची प्रक्रिया न्यायालयाने ठरवून दिली. जिल्हा बँकेचे कर्ज असल्याने जमीन विक्रीची प्रक्रिया स्थगित झाली मात्र न्यायालयात येत्या 13 ऑक्टोबर रोजी मी माझी बाजू मांडणार आहे. आता जर बोललो तर न्यायालयाचा अवमान होईल. त्यामुळे मी या विषयात पडणार नाही, असे खा. विखे सांगून जमीन विक्री प्रक्रियेबाबत माझा कोणताही संबंध नाही.उलट राहुरी तालुक्याने बाहेरचे नेतृत्व स्वीकारल्याबद्दल मी आभार मानतो. गेल्या 11 वर्षांत कारखाना चालला नाही अशा पद्धतीने कारखाना चालवून उच्चांकी गाळप व नियमित पेमेंट करून सभासदांची अपेक्षा पूर्ण केल्याचे खा. विखे म्हणाले.

राहुरी तालुक्यास लोकप्रतिनिधी नव्हता का? आज ते आमदार व माजीमंत्री आहेत. त्यांच्याच आजोबाच्या नावावर कारखाना आहे.हा कारखाना चालविण्याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे. राहुरीच्या सभासदांत सहनशीलता आहे ती इतर ठिकाणी कुठंही पाहायला मिळत नाही. कारखाना म्हटल्यानंतर अर्थकारण आले ते मागे पुढे होत असते. ज्या सभासदांना आम्ही योग्य वाटत नाही त्यांनी संचालक व्हावे व कारखाना चालवायला घ्यावा, असा टोला पत्रकार परिषद घेणारे सभासद तसेच धुमाळ व तनपुरे पिता -पुत्रांना लगावला.

अमृत धुमाळ व माजी खा.प्रसाद तनपुरे यांना तुम्ही कोणतेही आंदोलन करू नका, बचाव कृती समिती स्थापन करू नका. मी स्वतःहून तुमच्या ताब्यात कारखाना देतो, तुमच्याच वडिलांनी उभा केलेला कारखाना तुम्ही चालवलाच पाहिजे.तुमच्या वडिलांचे-आजोबांचे वैभव तुम्हीच पुन्हा निर्माण केले पाहिजे. आम्ही आमच्या वडिलांचे-आजोबा-पंजोबांचे वैभव टिकून ठेवले असल्याचे खा. विखे यांनी सांगितले.

डॉ.तनपुरे कारखान्याचे 6 वर्षांत मी सोने केले आहे. तुम्ही तर तो भंगारात विकायला काढला होता. 1800 टनावरून 4 हजार टनांपर्यंत करखाना नेऊन ठेवला. तुम्ही घेतलेले जिल्हा बँकेचे कर्ज आम्हाला फेडावे लागले. मी कर्जही घेतले नाही, वीजही वापरली नाही. त्याची भरपाई मला करावी लागली असे खा. विखे यांनी सांगितले.

माझ्या काळातील डॉ. तनपुरे कारखान्याकडे ज्या शेतकर्‍यांचे पैसे राहिले असतील त्या शेतकर्‍यांना मी माझे स्वतःचे घर विकून पैसे देण्यास बांधील आहे. 6 वर्षांत कारखाना नवा करून दिला आहे.तालुक्याच्या नेत्यांनी कारखाना चालविण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

डॉ तनपुरे कारखान्याची निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकते. हे माझे शेवटचे वर्ष आहे. या पुढील काळात कारखान्याची जबाबदारी तुमच्या राहुरीचे आमदार यांना द्यावी, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे डॉ.तनपुरे कारखाना चालू करण्यासाठी मोलाचे योगदान आहे त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मी करतो.

कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे म्हणाले, गेल्या वर्षी कामगार, सभासद यांच्या सहकार्यामुळे रेकॉर्ड ब्रेक गळीत केले त्यातून कामगारांची देणे मोठ्या प्रमाणात मिटवण्यात आले आहे मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला असेल तर मी शनिशिंगणापूरच्या शनी देवाच्या डोक्यावर हात ठेवायला तयार आहे. खासदार सुजय विखे यांच्यामुळे हा कारखाना सुरू झाला व सभासदांना न्याय मिळाला हे तालुक्यातील सभासदांनी विसरता कामा नये.

विषय पत्रिकेवरील विषयांवर नामदेवराव ढोकणे, कारभारी कणसे, अनिल शिरसाठ, पंढरीनाथ पवार, दत्तात्रय आढाव आप्पासाहेब ढुस, चांगदेव तारडे, बळीराम खुळे, भरत पेरणे, काळे गुरू आदींनी सहभाग घेऊन चर्चा केली.

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, रावसाहेब तनपुरे, कारखान्याचे व्हा.चेअरमन दत्तात्रय ढुस, राहुरी दूध संघाचे अध्यक्ष तान्हाजी धसाळ, उत्तमराव म्हसे, माजी चेअरमन व विद्यमान संचालक उदयसिंह पाटील, शामराव निमसे, संचालक मच्छिंद्र तांबे शिवाजी गाडे, विजय डौले, सुरसिंग पवार, केशवराव कोळसेे, बाळकृष्ण कोळसे, अशोक खुरुद, मधुकर पवार, उत्तमराव आढाव, रवींद्र म्हसे, नंदकुमार डोळस, गोरक्षनाथ तारडे, अर्जुन बाचकर, सुभाष वराळे, भारत तारडे, कारभारी डौले, बाळकृष्ण बानकर, आर.आर.तनपुरे, शिवाजी डौले, प्रफुल्ल शेळके, साहेबराव म्हसे, विक्रम तांबे, दत्तात्रय खुळे, सुरेश लांबे, राजेंद्र उंडे, शिवाजी डौले, पंढरीनाथ पवार, अर्जुन पानसंबळ, अनिल आढाव, सुनील आडसुरे, राजेद्र उंडे, सोन्याबापू जगधने, अमोल भनगडे, सुरेश बानकर, महेंद्र तांबे, नानासाहेब गागरे, शिवाजी सागर, माणिक तारडे, सूर्यभान म्हसे, चांगदेव भोंगळ, सुधीर तनपुरे, नारायण जाधव, भास्कर तांबे, बाबा खुळे, उत्तमराव खुळे, ज्ञानेश्वर विखे, प्रभाकर हरिश्चंद्रे आदी उपस्थित होते. सभेस सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संचालक सुरसिंग पवार यांनी मानले तर सूत्रसंचालन गणेश विघे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या