Tuesday, April 23, 2024
Homeनगर‘हवाई रेमडीसिवीर’चा तपास पोलिसांकडून सुरू

‘हवाई रेमडीसिवीर’चा तपास पोलिसांकडून सुरू

श्रीरामपूर | प्रतिनिधी

खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी विशेष विमानाने दिल्ली येथून रेमडेसिवीर इंजेक्शन आणल्याप्रकरणी तपास पोलिसांनी सुरू केला आहे. पोलीस उपअधिक्षक डॉ. संदीप मिटके यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिर्डी विमानतळावर जावून सीसीटीव्ही फूटेज प्राप्त केले असून ते न्यायालयात सादर केले जाणार आहे.

- Advertisement -

खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी विशेष विमानाने दिल्ली येथून रेमडेसिविर इंजेक्शन आणल्याची राज्यभर चर्चा झाली होती. सर्वसामान्यांना इंजेक्शन मिळत नसताना खासदार विखे यांना एवढ्या मोठ्या संख्येने इंजेक्शन कसे मिळाले, असा आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी या प्रकरणाचा तपास श्रीरामपूरचे पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांच्याकडे सोपविला.

खासदार विखेंनी असे आणले होते रेमडेसिवीर…

खासदार डॉ.विखे यांनी दिल्लीवरून विमानाने रेमडेसिवीर आणल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांनी रानही पेटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश गृह विभागाच्या प्रधान सचिवांना दिले. शिर्डी विमानतळावर 10 एप्रिल ते 25 एप्रिलपर्यंत आलेल्या सर्व खासगी विमानांचे सीसीटीव्ही फुटेज आणि रेकॉर्ड जतन करण्याचे आदेश दिले आहेत.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिर्डी विमानतळावरील खासगी विमानांच्या आवागमणाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यासाठी काल शुक्रवारी पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके विमानतळावर दाखल झाले होते. त्यांनी नियमानुसार फूटेज व अन्य माहिती ताब्यात घेतल्याची माहिती होती. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने याबाबत अधिक तपशील मिळू शकला नाही.

विखेंचे ‘हवाई रेमडेसिवीर’ : उच्च न्यायालयाने प्रशासनाला फटकारले, विमानतळाचे फुटेज ताब्यात घेण्याचे आदेश

खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्ली येथून विशेष विमानाने आणलेल्या रेमडेसिवीर प्रकरणाच्या तपासाबाबत पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांना विचारले असता, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तपास सुरु असून त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे ते म्हणाले. मात्र तपासास सरूवात केली यास त्यांनी दुजोरा दिला.

विखेंवर गुन्हा दाखल करा भाई जपतापांची मागणी

मुंबई : अहदनगरचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील विमानाने 10 हजार रेमडेसिवीर घेऊन येतात आणि वाटतात. हा काय प्रकार आहे?, असा सवाल काँग्रेस नेते भाई जगताप यांनी उपस्थित केला आहे. माझा सवाल केंद्र सरकारला आहे की, महाराष्ट्र सरकारला इंजेक्शन मिळत नाहीत मग भाजपचे हे खासदार हा साठा कुठून आणतात? याप्रकरणी खा.डॉ. विखे पाटील यांची चौकशी करून त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारला केली. ते मुंबई येथे बोलत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या