Thursday, April 25, 2024
Homeनगरगावाने कृषी उत्पादनाचा ब्रँड विकसित करावा - डॉ.गडाख

गावाने कृषी उत्पादनाचा ब्रँड विकसित करावा – डॉ.गडाख

राहुरी विद्यापीठ |वार्ताहर| Rahuri

गावातील शेतकर्‍यांनी एकत्र येऊन गावाचा पाच वर्षांचा पीक आराखडा तयार करावा. शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून गावातील कृषी उत्पादनावर गावातच प्रक्रिया करून कृषी मूल्यवर्धन करावे. शास्त्रज्ञ आणि कृषी विस्तार अधिकारी यांच्या मदतीने दर्जेदार कृषी उत्पादन घ्यावे. कृषी उत्पादनाचा गावाचा ब्रँड विकसित करावा. शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत विपणनाची साखळी निर्माण करावी. यामुळे गावातील पैसा गावातच राहील व शहरातील पैसा गावात येईल, असे प्रतिपादन संचालक संशोधन व विस्तार शिक्षण डॉ. शरद गडाख यांनी केले.

- Advertisement -

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने तांभेरे ता. राहुरी येथे दोन दिवसीय कृषी तंत्रज्ञान पारायणाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. गडाख बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीत तांभेरे गावचे सरपंच नितीन गागरे, प्रसारण केंद्र प्रमुख डॉ. पंडित खर्डे, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे प्रमुख डॉ. दत्तात्रय पाचारणे, शास्त्रज्ञ डॉ. अनिल दुरगुडे, डॉ. अशोक वाळुंज, डॉ. प्रकाश मोरे, मंडल अधिकारी राहुल ढगे, तांभेरे सोसायटीचे चेअरमन श्रीकांत मुसमाडे, मेजर ताराचंद गागरे उपस्थित होते.

शिवाजीराव जगताप म्हणाले, गावाने ग्रामविकास समिती स्थापन करावी व या समितीद्वारे गावाचा विकास आराखडा तयार करावा. ग्रामीण भागात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. कोविड-19 काळात बरेच व्यवसाय बंद पडले. परंतु शेती व्यवसाय हा अविरत सुरु राहिला व त्याने देशाची अर्थव्यवस्था सावरली. शेती ही देशाची अर्थव्यवस्था सावरु शकते तर गावाचा विकाससुध्दा घडवू शकते. शेतकर्‍यांना गावातच सामूहिक बिजोत्पादन घ्यावे व गावाची बियाण्यांची मागणी गावातच भागवावी. जमिनीच्या आरोग्यपत्रिकेनुसार खत व्यवस्थापन करावे. जमिनीतील जैवविविधतेचे संवर्धन करावे व जिवंत जमीन एका पिढीपासून दुसर्‍या पिढीकडे हस्तांतरीत करावी आणि शेती संस्कृती जपावी.

पहिल्या दिवशीच्या कृषी तंत्रज्ञान पारायणाच्या तांत्रिक सत्रात डाळिंब पिकांवर शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. यामध्ये डाळिंब पीक लागवडीसाठी जमिनीची निवड व निगा यावर डॉ. अनिल दुरगुडे, डाळिंब पिकावरील किडींचे नियंत्रण या विषयावर डॉ. अशोक वाळुंज आणि डाळिंब पिकावरील रोगांचे व्यवस्थापन या विषयावर डॉ. प्रकाश मोरे यांनी मार्गदर्शन केले. शिवार फेरीमध्ये गोकुळ मुसमाडे आणि डॉ. बापूसाहेब मुसमाडे यांच्या डाळिंब बागेत शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. दुसर्‍या दिवसाच्या तांत्रिक सत्रात खरीप हंगाम पूर्वतयारी या विषयावर डॉ. दत्तात्रय पाचारणे, कपाशीवरील बोंड अळी व ऊस पिकातील हुमणी अळीचे नियंत्रण या विषयावर डॉ. नंदकुमार भुते यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. स्वागत व प्रास्ताविक डॉ. दत्तात्रय पाचारणे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. भगवान देशमुख यांनी तर आभार डॉ. गोकुळ वामन यांनी मानले. या कृषी तंत्रज्ञान पारायणास तांभेरे गावाचे शेतकरी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या