Wednesday, April 24, 2024
Homeजळगावदिलासादायक । येत्या दीड महिन्यात करोनाची लाट ओसरणार !

दिलासादायक । येत्या दीड महिन्यात करोनाची लाट ओसरणार !

डॉ.संग्राम पाटील हे मुळचे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील आहेत. सध्या ते इंग्लंडमधील ग्वेनेड हॉस्पिटलमध्ये आयसीयू प्रमुख आहेत. फेसबूक, युट्युबच्या माध्यमातून कोरोनाबाबत डॉ. पाटील अतिशय सोप्या शब्दांत सामान्यांना कळेल अशी माहिती नियमित देत असतात. ‘देशदूत’ने त्यांच्याशी संवाद साधला. काय म्हणाले डॉ. पाटील? वाचा त्यांच्याच शब्दात.

सध्या कोरोनामुळे जी अशांतता निर्माण झालेली आहे, ती कायमची नाही हे लक्षात ठेवा. ही परिस्थिती बदलणार आहे. येत्या काही दिवसात कोरोनाचा जोर ओसरलेला असेल आणि येत्या एक ते दीड महिन्यांमध्ये आपल्याकडे लॉकडाऊन संपून बर्‍याचशा गोष्टी पुन्हा सुरू झालेल्या असतील.

- Advertisement -

मला आठवतं की मी पण कोरोनाला कसं हरवायचं हे मागच्या वर्षी बोलत होतो आणि दुर्दैवाने या वर्षीदेखील मी त्यावरच बोलतो आहे. यावरून आपल्याला त्याचं गांभीर्य कळायला हवं की हे संकट किती मोठे, व्यापक आणि किती गंभीर आहे हे कळतं.

मागच्या वर्षीच आपल्याला डब्ल्यूएचओने सांगितलं होतं की कोरोनाचं हे संकट काही लगेच संपणारं नाही. हा पाहुणा लगेच जाणारा नाही. अजून देखील तो तसा संपणार नाही पण तो ज्या पद्धतीने आपल्याला त्रास देतोय असा त्रास कायम राहणार नाही. तो कमी होणार आहे.

शंभर वर्षांपूर्वी व्हायरस निघाला होता त्याच्या देखील अशा तीन लाटा आल्या होत्या. कोरोनाच्या अशा तीन लाटा काही देशांमध्ये येवून गेल्या आहेत. काही देशात तीन लाटा येऊन गेल्या आता ते चौथ्याची तयारी करत आहेत.

इकडे आमच्याकडे आम्ही तिसर्‍या लाटेची तयारी करत आहोत. आता दुसरी लाट जवळजवळ संपली. आमच्या आयसीयू मध्ये आता कोरोनाचे शून्य पेशंट आहेत. भारत मात्र तीन-चार महिने मागे असतो. इकडे डिसेंबरमध्ये लाट सुरू झाली.

भारतात मार्चमध्ये तिने जोर धरला. साधारणतः आपण तीन महिने याच प्रक्रीयेतून जातो. इकडे लाट सुरू झाली एप्रिलमध्ये आणि आपल्याकडे जून-जुलैमध्ये पेशंट खर्‍या अर्थाने वाढले. चांगली गोष्ट अशी होती की पहिली लाट आपल्याकडे खूप माईल्ड आली.

साउथ एशिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, भारत आणि सगळीकडे अशी पहिली लाट माईल्डच होती. भारतासारख्या देशात एक लाखाच्यावर केसेस गेल्या नाही. दुसरी लाट मात्र जवळजवळ सगळीकडे काही मोजके देश सोडले तर सगळीकडे खूप भयावह आहे.

शंभर वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूची लाट आली होती. ती देखील अशीच होती. दुसरी लाट मोठी आली होती. या दुसर्‍या लाटेत जवळजवळ पाच ते दहा कोटी लोक त्या वेळेला मृत पावले होते, ही नोंद आहे. त्यातील बहुसंख्य लोक भारतातील होते. आता आपण तशाच परिस्थितीला सामोरे जात आहोत. आता भारतात सगळ्यात जास्त भयानक या लाटेचे स्वरुप आहे. अनेकांचे मृत्यू होत आहेत आणि असंख्य लोकांबाबत तर आपण काहीच करत नाहीये. त्यांच्या टेस्टिंगच नाहीये, त्यामुळे आपल्याकडे भयानक परिस्थिती आहे. परंतु ही अशीच राहणार आहे का? तर नाही राहणार. महाराष्ट्रामध्ये लाट सर्वप्रथम सुरू झाली म्हणून येत्या काही दिवसात महाराष्ट्रात लाट ओसरु लागेल. हे त्या करोना व्हायरसचं बिहेव्हिअर आपल्याला दिसलेलं आहे. लॉकडाऊन, निर्बंध यामुळे ते कमी होते आहे. काही ठिकाणी आता आकडे स्थिरावले आहेत. महाराष्ट्रात सध्या करोनाचा उच्चांक आलेला आहे. पुढचे काही दिवस तो असाच राहील आणि मग हळूहळू कमी व्हायला लागेल.

या काळात आपण काय करायचं? महाराष्ट्र शासनाने एक छान ब्रिदवाक्य दिलेलं आहे, माझे कुटुंब ही माझी जबाबदारी आहे. याचे अगदी तंतोतंत पालन करायचे. सरकारने जे काय नियम सांगितले आहेत त्याचे पालन करायला हवे. एखाद्या कोरोना पॉझिटिव व्यक्तीच्या सभोवताली दोन मीटर अंतरावर, पाच फुटाच्या अंतरावर त्याच्याशी बोलताना, खोकताना, शिंकताना तो सरळ आपल्या नाकातोंडात जाऊ शकतो. आपण दूर असलो तरी असा व्यक्ती जर कुठे शिंकलेला, खोकलला असेल तर त्याच्या पृष्टभागावरच्या वायरसच्या आपण संपर्कात येऊ शकतो. याबाबत आपण दक्षता घ्यायची आहे की, लोकांच्या जवळ जायचं नाही, जावचं लागले तर मास्क वापरायचा. हात स्वच्छ ठेवायचे. हात आपल्या चेहर्‍याला लावायचे नाही, गर्दीत जायचं नाही, कोणाला घरी बोलवायचं नाही आणि कामाच्या आणि प्रवासाच्या ठिकाणी काळजी घ्यायची. एवढं करुनही आपल्याला लक्षणं आलीच तर घाबरुन जायचं नाही. लक्षण फार साधी आहेेत. ते फार बदललेले नाहीत.

मीडिया, सोशल मीडियातून आपल्याला ब्रेकिंग न्यूज देतात की नवीन लक्षण चिंताजनक आहेत पण या कुठल्याही गोष्टी आपण फार गांभीर्याने घ्यायचे नाही. ताप, नव्याने सुरू झालेला खोकला, चव जाणे, वास जाणे, अशक्तपणा यासारखी लक्षणे येतात. घसा दुखतो. ही लक्षणं आली की सध्याच्या काळात आपल्याला कोविड झालेला आहे असे समजायचे. कारण तोच समज समाजामध्ये आहे. अशी लक्षणे दिसल्यावर एक दिवस, दोन दिवस वाट बघा. बरे वाटत नसेल तर सरळ टेस्ट करा आणि लक्षणांची सुरुवात झाल्या झाल्या स्वतःला आयसोलेट करा. वेगळ्या खोलीमध्ये झोपा. आपल्याकडे स्वतंत्र खोली नसेल तर टेस्टिंग केल्या केल्या क्वारंटाईन सेंटर्स, कोरोना सेंटर्समध्ये जाऊन थांबा. काय सोय करायची करा पण वेगळे व्हा. मास्क लावा. कोरोनाची टेस्ट पॉझिटीव्ह आली म्हणजे आपण आता गंभीर होणार, आपण आता मरणार असं नाही.

हजारांमध्ये एक ते दहा हजार मध्ये एक एवढं मृत्यूचे प्रमाण आहे. ते देखील जे वयस्कर लोक आहेत, जे साठी, सत्तरीच्या वर आहेत यांच्यामध्ये आहे किंवा डायबेटिस, ब्लडप्रेशर सारखे आजार असतील, कुठलीतरी मेडिकल कंडीशन असेल तर या लोकांना धोका आहे. सशक्त तरुण लोकांना, मुलांना मुलींना हा आजार गंभीर होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. भारतात जरी आपल्याला काही तरुणांच्या मृत्युच्या बातम्या येत असल्या तरी कोरोनाचा जो विस्तार, व्याप्ती आहे ती जर बघितली तर हे प्रमाण काहीच नाही. त्यामुळे कोरोना झाला तर काळजी करू नका. आता आपल्याला पुढचा आठवडा ते दोन आठवडे विलगीकरण होऊन या सगळ्या प्रकरणातून जायचं आहे एवढा फक्त धीर ठेवायचा. पाच सहा दिवसांनंतरही जर ताप जात नसेल आणि खोकला फारच वाढत असेल तर छातीचा एक्स-रे करून काही रक्ताच्या तपासण्या, पांढर्‍या पेशी वगैरे बघायचे आहे.

सगळ्यांनीच हे करायचं नाहीये. जर पाच सहा दिवसा नंतर आपला त्रास वाढला तरच या गोष्टी करायच्या आहेत. ऑक्सिजनची पातळी मोजता आली तर पाच सहा दिवसा नंतर मोजा. अगदी पहिल्या दिवसापासून रोज दहा वेळा मोजत बसलात तर उगाच टेन्शन येतं त्यामुळे याची गरज देखिल नाही. मग न्युमोनिया निघाला, ऑक्सिजनची पातळी कमी आहे त्यानुसार औषधोपचार सुरू होईल. तोपर्यंत औषधोपचार कुठलाही यावर काम करत नाही. त्यामुळे भराभर औषधे लिहून दिली जात आहे हे चुकीचे आहे. हे घेऊ नका.

जर तुम्हाला श्वास लागत असेल तर छातीचा एक्स-रे करुन घ्या, सिटीस्कॅन गरजेचा नाही. यात तुम्ही चार पाच हजार घालवाल, तेवढ्यात त्या पेक्षा 20% किमतीत तुमची ट्रीटमेंट होईल. हे लक्षात घ्या व इतरांना धीर द्या. मात्र टेस्ट करा. टेस्टला घाबरु नाक, त्यापासून दूर पळू नका. टेस्ट पॉझिटिव्ह आली तर मला 14 दिवस पूर्ण आयसोलेट व्हायचे आहे त्याच्यासाठी टेस्ट करायची आणि जर टेस्ट निगेटिव आली आणि लक्षणे दोन-तीन दिवसात गेले तर याचा अर्थ तुम्हाला कोरोना नव्हता दुसरे कुठलं तरी इन्फेक्शन होतं. तुम्ही आयसोलेट व्हायची गरज नाही. एकादा लक्षणे गेली की त्या वेळी बाहेर जाऊ शकता. आपण आपल्या पातळीवर आणि कुटुंबाच्या पातळीवर जर कोरोनाचं असं नियोजन केलं तर कोरोना पसरणं प्रचंड प्रमाणात कमी होईल. याला कोविड अ‍ॅप्रॉप्रिएट बिहेव्हिअर म्हणतात. ही पंचसूत्री म्हणून मी अनेक वेळा बोललो आहे. या पाच गोष्टी पाळल्या तर कोरोना विषाणू निष्प्रभ होईल. कोरोना हा हवेतून दुसर्‍याकडे जात नाही, दुसर्‍याच्या घरी जात नाही. करोना हा जर एखाद्या पृष्ठभागावर पडला तर तो जिवंत राहत नाही. तो काही तासानंतर, दोन तीन दिवसानंतर मरतो. त्यामुळे तो फक्त मानवाच्या शरीरात वाढतो आणि दुसर्‍याकडे जातो. त्यामुळे ज्यांच्या शरीरात आहे त्याने आपल्याच शरीरात त्याला निष्प्रभ करायचे आणि इतर जे पृष्ठभाग आहेत तेथून आपल्या शरीरात घ्यायचा नाही एवढी साधी काळजी आम्हाला घ्यायची आहे. असं केलं तर आपण कोरोनाचा प्रसार अगदी काही दिवसात थांबवू. जे लोक गंभीर होतील, ते माईल्ड मॉडरेट जर लक्षणे असतील तर आपण घरीच उपचार करू. गंभीर झाले, श्वास लागायला लागला, त्यांचा ऑक्सिजन कमी झाला किंवा एखाद्याला छातीच्या एक्स-रे मध्ये न्युमोनिया दिसतोय आणि त्यांना डायबेटिस, ब्लडप्रेशर आहे, त्यांचे वय साठीच्या पलीकडे आहे तर अशा लोकांना हॉस्पिटलला, कोविड सेंटरला कुठेतरी देखरेखीखाली ठेवावं लागेल. यातील काही जणांचा ऑक्सिजन कमी होइल त्या लोकांना स्टेरॉईडच्या गोळ्या किंवा रेमडेसीवीरचे इंजेक्शन उपलब्ध असेल तर अशा लोकांना ट्राय केले जाईल. उपलब्ध नसेल तर काळजी करायची नाही. कारण रेमडेसिविर काही जीव वाचवणारे औषध नाही. त्यामुळे रेमडेसिवीरचा बाऊ केला जातोय, कोणी राजकारण करत आहे. त्यावरून विरोधी पक्ष आणि सरकार यांच्यात वाद चाललाय. कोणीतरी खासदाराने ते दिल्लीतून विमानाने आणले वगैरे त्या बातम्या होत्या. मला याची दया येते आणि हसू येते. ज्या औषधाचा फारसा परिणाम नाही, डब्ल्यूएचओ नाही सांगते त्याच्यासाठी एवढा बाऊ करायची गरज नाही. कोरोनाची अगदी साधी उपचार पध्दती आहे. तरुण लोक किंवा वयस्कर लोक कोरोनामध्ये गंभीर का होतात किंवा काही लोक मृत्यू पावतात हे बघायला पाहिजे. याचं कारण हे आहे की ज्या लोकांना कोरोना उपचारांची गरज आहे त्यांना आपण बेड उपलब्ध करुन देऊ शकत नाही. त्यांना वेळीच ऑक्सिजन देऊ शकत नाही, वेळीच बायपॅक मशिन मिळू शकत नाही किंवा व्हेंटीलेटर मिळवून देऊ शकत नाही. अशा रुग्णांना ते मिळवून देऊ शकलो तर अनेकांचे प्राण वाचतील. यासाठी ज्यांना गरज नाही त्यांनी जर घरीच मॅनेजमेंट केली तर हा तुटवडा थोडा फार प्रमाणात आपल्याला कमी करता येईल. ऑक्सिजन कसा उपलब्ध करून द्यायचा? औषध कसे उपलब्ध करून द्यायचे? या गव्हर्मेंट आणि ऍडमिनिस्ट्रेशनच्या गोष्टी आहेत. त्या त्यांनी बघितले पाहिजे. ते बघू शकत नसतील तर हे त्यांचे अपयश आहे. त्याबाबत आपण फार काही करू शकत नाही. यामध्ये आपण समन्वय साधू शकतो, कार्यकर्ते म्हणून लोकांना मदत करू शकतो. धीर देऊ शकतो. रेमडेसीवीरसाठी लोक फिरत असतील तर आपण सांगू शकतो की हे तुम्ही बंद करा. या गोष्टीमध्ये वेळ, पैसा घालवू नका. सीटी स्कॅनसाठी कोणी फिरत असेल तर त्यांना सांगा सिटीस्कॅन करू नका, डिजिटल एक्सरे करा. त्यातही सारी काही माहीती कळते. अशा रितीने आपण ग्राऊंडवर कोविड मॅनेजमेंट केलं तर काही दिवसात आपण मात करु शकतो. यासोबतच लोकांचे व्हॅक्सिनेशन करणे आणि जेव्हा अनलॉक प्रक्रिया सुरू होईल त्या वेळेला काळजी घेणे, गर्दी न करणे हे पाळावे लागेल. जगभरात कोवीड अशाच पध्दतीने नियंत्रणात आलेला आहे. इंग्लंडमध्ये गव्हर्मेंटने लॉकडाऊन केला. ख्रिसमस पासून ते मार्चपर्यंत तीन महिन्यांचा लॉकडाऊन केला. या काळात वेगाने लसीकरण केलं. जगभरातून त्यांनी लस मागवल्या, विकत घेतल्या, प्रिऑर्डर केलेल्या होत्या आणि लोकांना दिल्या. आता त्यांचं 55 ते 60 टक्के लसीकरण पूर्ण झाले. त्यामुळे त्यांनी परत मार्केट आता हळूहळू सुरू केलेले आहे पण मार्केटमध्ये तुम्हाला कोणीही मास्क शिवाय दिसणार नाही. दुकानांमध्ये मास्क शिवाय प्रवेश नाही, बस, ट्रेनमध्ये मास्क शिवाय येऊ देत नाहीत. मी देखील इकडे हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा सॅनेटाईज करायला लागते आणि मास्क घालुनच प्रवेश मिळतो. या सगळ्या गोष्टी आपण देखिल पाळल्या तर मग पुढची येणारी तिसरी लाट अतिशय सौम्य असेल. त्याचं टेन्शन देखील आपल्या यंत्रणांना हॉस्पिटलच्या डॉक्टरांना येणार नाही. निर्माण झालेली परिस्थिती बदलणार आहे. येत्या काही दिवसात कोरोना ओसरेल आणि येत्या एक ते दीड महिन्यांमध्ये आपल्याकडे अनलॉकींग होऊन बर्‍याचशा गोष्टी पुन्हा सुरू झालेल्या असतील. मी अशी आशा करतो आहे की जून मध्ये किंवा जास्तीत जास्त जूनच्या अखेरीस आपले कॉलेज, शाळा देखील सुरु करायचा विचार सरकार करू शकते.

दरम्यान लशींची उपलब्धता मुबलक झाली तर अजून चांगले होईल. त्या बाबतीत देखील एक महत्त्वाचं सांगू इच्छितो की ज्यांना कोरोना होऊन गेला आहे त्यांनी लसची घाई करण्याची गरज नाही. मागच्या वर्षी ज्यांना कोरोना झाला त्या लोकांना यावर्षी कोरोना झालेला नाही. बहुतांश लोकांना प्रोटेन्शन मिळालेले आहे. खूप कमी लोक आहेत की त्यांना पुन्हा झाला, तो देखील गंभीर आजार झाला नाही. याचा अर्थ काय आहे, मागच्या वर्षी ज्यांना ज्यांना कोरोना झालेला आहे त्यांना आज देखील इम्युनिटी आहे. त्यामुळे तुम्हाला पूर्वी कोरोना झालेला असेल तर तुम्ही लसीची घाई करू नका. ज्यांना गेल्या सहा महिन्यात झाला असेल तरी घाई करू नका. काही गंभीर आजार असतील तर मात्र प्राधान्याने लस घ्या. तुम्ही 35 च्या पुढचे असाल तर लसीकरण करुन घ्या. 35 च्या आत असाल तर लसीची उपलब्धता पाहून निर्णय घ्या. कारण तुम्हाला तूर्त गरज नाही. आधी पस्तिशीच्या पुढच्या लोकांना घेऊ द्या आणि मग तुम्ही घ्या असे मी तुम्हाला आवाहन करेल. कोरोना स्थिती हाताळतांना पश्चिमी देशांमध्ये बहुतांश देशांमध्ये कुठे तारांबळ उडली नाही. लोक मेले, हॉस्पिटल फूल झाले पण आपल्याकडे जसा गोंधळ झाला, लोक घाबरले असे लोक फार कुठे घाबरले नाहीत. आपण या सगळ्या गोष्टींचा खूप जास्त बाऊ करतो, राजकारण करतो, सोशलमिडीया मधून परत परत पुन्हा पुन्हा चर्वण करतो त्यामुळे जास्त टेन्शन झाले आहे. कोरोना काय आहे? कसा होतो आणि झालाच तर काय कााळजी घ्यायची याची माहिती ठेवा मग घाबरायचे कारण नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या