Friday, May 10, 2024
Homeनगरआगामी वर्षात राज्यातील सर्वात मोठा अतिदक्षता विभाग उभारणार : डॉ. विखे

आगामी वर्षात राज्यातील सर्वात मोठा अतिदक्षता विभाग उभारणार : डॉ. विखे

लोणी |वार्ताहर| Loni

गेल्या वाढदिवसाला आयुर्वेदिक महाविद्यालय उभारणीचा केलेला संकल्प पूर्ण केला. आता आगामी वर्षात राज्यातील सर्वात मोठा अतिदक्षता विभाग उभारणार असल्याचे प्रतिपादन प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी केले. तर फिल्मी हिरोंपेक्षा समाजात आदर्श काम करणारे खरे हिरो शोधायला हवेत, असे उद्गार नाम फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी काढले.

- Advertisement -

लोणी येथील प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या वतीने कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रवरा मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त एम. एम. पुलाटे होते. डॉ. एन. एस. म्हस्के, कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे, विश्वस्त सुवर्णाताई विखे, मोनिकाताई सावंत, कल्याणराव आहेर, ध्रुव विखे पाटील, विखे कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडू, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, डॉ. भास्कर खर्डे, अ‍ॅड.आप्पासाहेब दिघे, बापूसाहेब आहेर, संजय आहेर, रजिस्ट्रार डॉ. संपत वाळूज, महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, प्रवरा उद्योग समुहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, लोणीचे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते डॉ. राजेंद्र विखे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ. विखे म्हणाले, पद्मश्री डॉ. विखे पाटील व लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी वंचित, उपेक्षित घटकांच्या आरोग्य आणि शिक्षणाची ग्रामीण भागात सोय व्हावी यासाठी प्रवरा मेडिकल ट्रस्ट, प्रवरा शिक्षण संस्था सुरू केली. त्यांच्या कामाचा वसा घेऊन आपण त्याचा विस्तार करताना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहोत.

गेल्या वाढदिवसाला आयुर्वेदिक महाविद्यालय सुरू करण्याचा केलेला संकल्प पूर्णत्वाकडे गेला असून आता राज्यातील सर्वात मोठा अतिदक्षता विभाग येत्या वर्षभरात उभारण्याचा संकल्प केला आहे. त्याचबरोबर सुपर स्पेशालिटी रुग्णालयही उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोविडच्या काळात गरजुंना मोलाचा आधार देण्यासाठी आपण डॉक्टर, कर्मचारी यांच्या मदतीने चांगले काम करू शकलो याचे समाधान वाटते.

मकरंद अनासपुरे यांनी विखे परिवाराच्या ग्रामीण भागातील सेवा कार्याचे कौतुक करताना एक माणूस मोठा होण्यापेक्षा अनेकजण मोठे झाले पाहिजेत हा विचार समाजात रुजायला हवा. सिनेमातील हिरोंपेक्षा समाजातील गरजू, निराधार, उपेक्षित वर्गासाठी जीवन जगणार्‍या खर्‍या हिरोंचा शोध घेऊन त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.

यावेळी एम. एम. पुलाटे, डॉ. एन. एस. म्हस्के, डॉ. मगरे यांनी मनोगत व्यक्त केले. करोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील महिलांना शिलाई मशीनचे वितरण यावेळी करण्यात आले.आभार डॉ.वाळुंज यांनी मानले.

डॉ. कुंकूलोळ यांना अश्रू अनावर

डॉ. राजेंद्र विखे पाटील मनोगत व्यक्त करीत असताना त्यांनी करोना काळातील आठवणी सांगितल्या. मात्र प्रवरा कोविड सेंटरचे मुख्य समन्वयक म्हणून ज्यांनी रात्रंदिवस मेहनत घेत योध्द्याप्रमाणे लढाई लढलेले डॉ. राहुल कुंकूलोळ यांचा विशेष उल्लेख करीत त्यांना व्यासपीठावर बोलावून घेतले. मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला. यावेळी डॉ. कुंकूलोळ भावूक झाले आणि त्यांना अश्रूही अनावर झाले. सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांनी उभे राहून त्यांचे कौतुक केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या