करोना लसीकरण पूर्णपणे सुरक्षित

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात करोनाची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक आरटीपीसीआर चाचण्या घेणे तसेच बाधित व्यक्तींच्या निकट संपर्कातील व्यक्तींची लवकर चाचण्या होणे आवश्यक आहे.

त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने कार्यवाही करण्याच्या सूचना राज्य शासनाचे कोविड सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केल्या. करोना लसीकरण पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचे किंवा मनात किंतू बाळगण्याचे कारण नाही.

कोणतीही लस अथवा इंजेक्शन घेतल्यानंतर किरकोळ प्रमाणात ताप, अंग दुखणे, मळमळ होणे आदी लक्षणे जाणवतात. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. लसीकरणावेळी जिल्ह्यात चार आरोग्य कर्मचार्‍यांना जाणवलेली लक्षणे याच प्रकारची होती. त्यामुळे कोणताही गैरसमज या लसीकरणाविषयी नको, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात डॉ. म्हैसेकर यांनी करोनाविषयक बाबींचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंखे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष डॉ. अनिल आठरे, जिल्हा टास्क फोर्सचे सदस्य डॉ. एस. दीपक आदींची यावेळी उपस्थिती होती.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *