Friday, April 26, 2024
Homeनगरओलाव्याचे व्यवस्थापन करून रब्बी यशस्वी करा : डॉ. गडाख

ओलाव्याचे व्यवस्थापन करून रब्बी यशस्वी करा : डॉ. गडाख

राहुरी विद्यापीठ |वार्ताहर| Rahuri Vidyapith

रब्बी हंगामातील असणार्‍या महत्वाच्या ज्वारी व हरभरा या पिकांचे अनुक्रमे 21 लाख व 23 लाख हेक्टर क्षेत्र संपूर्ण देशात आहे.

- Advertisement -

ज्वारीपासून मिळणार्‍या धान्याला मानवाच्या आहारात महत्वाचे स्थान असून ज्वारीचा कडबा हा दूध धंद्यातील शेतकर्‍यांना जनावरांच्या खाद्यासाठी महत्त्वपूर्ण असा स्त्रोत आहे. यावर्षी खरीप हंगामात सरासरीपेक्षा अधिक झालेल्या पावसाने खरिपातील पिकांचे खूप नुकसान झालेले आहे.

अजूनही पाऊस सुरू असून या जास्त झालेल्या पावसामुळे जमिनीत असलेल्या ओलाव्याचे शेतकर्‍यांनी योग्य व्यवस्थापन करून रब्बी हंगाम यशस्वी करावा, असे प्रतिपादन विद्यापीठाचे संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा शेतकरी प्रथम प्रकल्प व कृृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने रब्बी ज्वारी व हरभरा उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर एकदिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी डॉ. गडाख बोलत होते. याप्रसंगी प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. पंडित खर्डे, विभागीय विस्तार केंद्र, जळगावचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. मुरलीधर महाजन, सहसमन्वयक डॉ. सचिन सदाफळ, डॉ. भगवान देशमुख, मंडल कृषी अधिकारी विक्रम वाघमोडे व रायभान गायकवाड उपस्थित होते.

डॉ. गडाख म्हणाले, शेतकर्‍यांनी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केल्यास त्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. ज्वारीपासून वेगवेगळे 125 पदार्थ तयार करता येतात. अशा प्रकारच्या मूल्यवर्धनातून शेतकर्‍यांचा आर्थिक फायदा होत असल्यामुळे पिकांच्या उत्पादनाबरोबरच मूल्यवर्धनावर भर देणे हिताचे होणार आहे. यासंबंधी अन्नशास्त्र विभागातील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने मूल्यवर्धनावर आधारित प्रशिक्षणाचे आयोजन करण्याचे त्यांनी यावेळी सुचविले.

यावेळी झालेल्या तांत्रिक चर्चासत्रात प्रा. सुदाम निर्मळ, डॉ. दिलीप दुधाडे, डॉ. नंदकुमार कुटे व डॉ. सी.एस. चौधरी यांनी रब्बी ज्वारी व हरभरा या पिकांच्या उत्पादन तंत्र व किड रोगांचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. स्वागत व प्रास्ताविक डॉ. पंडित खर्डे यांनी केले.

सूत्रसंचालन डॉ. भगवान देशमुख यांनी केले तर आभार डॉ. सचिन सदाफळ यांनी मानले. या कार्यक्रमासाठी चिंचविहिरे व कणगर या गावांतील शेतकरी ऑनलाईन उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहयोगी विजय शेडगे व प्रक्षेत्र सहाय्यक किरण मगर व राहुल कोर्‍हाळे यांनी काम पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या