Friday, April 26, 2024
HomeUncategorizedहुंडाबळी प्रकरण: पतीसह सासू, सासर्‍यास दहा वर्षे सक्‍तमजुरी

हुंडाबळी प्रकरण: पतीसह सासू, सासर्‍यास दहा वर्षे सक्‍तमजुरी

औरंगाबाद- लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांतच विवाहितेला कपड्याचे दुकान टाकण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेवून ये असा तगादा लावत तिचा मारहाण करुन छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. या हुंडाबळी प्रकरणी आरोपी पतीसह सासू आणि सासर्‍यास प्रत्येकी दहा वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली प्रत्येकी 35 हजार याप्रमाणे एकूण एक लाख पाच हजारांचा दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. भिष्मा यांनी ठोठावली.

पती रामेश्‍वर उर्फ रमेश दत्तू पाचपुते (30), सासरा दत्तू रामा पाचपुते (60) आणि भिष्माबाई दत्तु पाचपुते (55 सर्व रा. जळगाव मेटे, ता. फुलंब्री) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात निवृत्ती रामराव म्हसलेकर (55 रा. म्हसला ता. बदनापुर जि. जालना) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादीची मुलगी मयत राणी (20) हिचे लग्न 6 मे 2013 रोजी आरोपी रामेश्‍वर उर्फ रमेश पाचपुते याच्याशी झाले होते. लग्नाच्या थोड्याच दिवसांनी आरोपींनी कपड्याचे दुकान टाकण्यासाठी राणीला माहेरहून दोन लाख आण असा तगादा लावला. पैशांसाठी आरोपी राणीचा शारिरीक व मानसिक छळ करित होते. तिला मारहाण करित होते. 12 सप्टेबर 2013 राणीने फिर्यादीला फोन करुन सासरकडील लोक मारहाण करुन त्रास देत असून मला येथून घेवुन जा असे सांगितले. त्यावर फिर्यादीने दोन दिवसांत कापूस विकून पैसे आणून देतो, असे सांगितले.

- Advertisement -

13 सप्टेबर 2013 सकाळी सात वाजता गावातील शामराव म्हसलेकर याने फिर्यादीला फोन करुन सांगितले की, राणी सकाळ पासून घराबाहेर गेली आहे, तिचा शोध घेतला मात्र ती सापडत नसल्याचे सांगितले. हे एकताच फिर्यादी हे नोतवाईकांसह जळगाव मेटे येथे आले. राणीची शोधाशोध केली असता आरोपीच्या शेतातील विहिरीत राणी मृत अवस्थेत सापडली. तसेच विहरीजवळ राणीने लिहलेली चिठ्ठी देखील सापडली. प्रकरणात वडोदबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला.

गुन्हृयाचा तपास करुन सहायक पोलीस निरीक्षक सुरवसे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. प्रकरणाच्या सुनावणीवेळी अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतिष मुंडवाडकर सात साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात, सुसाईड नोट, फिर्यादीची साक्ष आणि 12 सप्टेबर 2013 रोजी केलेल्या कॉल डिटेल महत्वाची ठरले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवाद व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने वरील तिघा आरोपींना भादंवी कलम 304 (ब) अन्वये प्रत्येकी 10 वर्षे सक्तमजुरी, दहा हजार रुपये दंड, कलम 306 अन्वये सात वर्षे सक्तमजुरी पाच हजार रुपये दंड, कलम 498 (अ) एक वर्षे सक्तमजुरी, पाच हजार दंड, हुंडा प्रतिबंधक कायद्याचे कलम 3 अणि 4 अन्वये प्रत्येकी पाच वर्षे सक्तमजुरी 15 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

प्रकरणात दाखल गुन्ह्यात मयताची नणंद स्वाती पाचपुते आणि दिर कैलास पाचापुते यांची निर्दोष मुक्‍तता करण्यात आली. प्रकरणात अ‍ॅड. मुंडवाडकर यांना अ‍ॅड. रामेश्र्वर इंगळे आणि पैरवी अधिकारी नईम यांनी मदत केली.

सासर्‍याची सुनेवर होती वाईट नजर

आरोपी सासर्‍याची राणीवर वाईट नजर होती, त्याने वाईट हेतूने तिचा हात पकडला होता. याबाबत राणीने आई वडीलांना सांगितले होते. राणीने फिर्यादीला दोन लाख रुपये द्या, खूप छळ होत आहे, असे सांगितले होते. त्यावर फिर्यादीने राणीच्या पती व सासर्‍याला कापूस विकल्यावर पैसे देतो, असे सांगितले. त्यानंतरही आरोपी राणीला उपाशी ठेवून मारहाण करित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या