Friday, April 26, 2024
Homeनाशिकद्राक्षबागांवर डाऊनी व बुरशीचा प्रादुर्भाव

द्राक्षबागांवर डाऊनी व बुरशीचा प्रादुर्भाव

खेडलेझुंगे | Khedlezunge

मे-जून महिन्यामध्ये द्राक्षपंढरी समजल्या जाणार्‍या तालुक्यामध्ये शेजारील तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर मजूर स्थलांतरीत होत असतो. परंतू करोनामुळे परिसरातून मजूरांचे स्थलांतर देखील अत्यल्प राहिले आहे.

- Advertisement -

साहजिकच त्याचा परिणाम शेतीमशागतींच्या कामावर झाला. शेतात पाणी साचल्याने मका, सोयाबीन सारखी पीके वाया गेली. सध्या द्राक्षहंगाम बहरात आल्याने शेतकरी मजूरांची डिपिंग, थिनिंग, औषध फवारणीची कामे सुरू असून सततच्या ढगाळ हवामानामुळे द्राक्षबागांवर डावण्या, करपा, बुरशी या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकर्‍यांची डोकेदुखी वाढली आहे.

यावर्षी करोना संसर्गामुळे बाजारपेठा बंद होत्या. त्याचा थेट परिणाम शेतमाल विक्रीवर झाला. मागील वर्षी हातात आलेले द्राक्ष पीक करोनामुळे कवडीमोल भावाने विकावे लागले. तर यावर्षी सुरुवातीसह परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतात पाणी साचले. त्यामुळे मका, सोयाबीन, भाजीपाला आदी पीके वाया गेली. शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने पाठविलेल्या कांदा पीकाला देखील लिलाव बंदचा फटका बसला.

ग्रामीण भागातही करोना संसर्ग वाढल्याने यावर्षी पेठ, सुरगाणा, सापुतार्‍याहून येणार्‍या मजूरांचे प्रमाण घटले. मागील वर्षी झालेल्या द्राक्ष पीकाची नुकसानभरपाई या हंगामात भरुन निघेल अशी अपेक्षा करत शेतकर्‍याने द्राक्ष मशागतीची कामे सुरू केली. मात्र परतीच्या पावसामुळे टोकणातील व फुलोर्‍यातील द्राक्षबागांना या पावसाचा फटका बसला. त्यामुळे घड जिरण्याचे प्रमाण वाढले.

या द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकरी पोषके व किटकनाशके औषधांची फवारणी करीत असतांनाही मावा, करपा, भुरी रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकर्‍याची चिंता वाढली आहे. त्यातच प्रतिकूल हवामानामुळे यंदा द्राक्षांचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. डावण्याचा प्रादुर्भाव वाढल्याने घडांमध्ये पाणी टिकून घडकूज होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर फुलोर्‍यातील घडांची कूज होऊ लागली आहे.

त्यामुळे शासनाने शेतीपीकांना योग्य हमी भाव जाहीर करणे गरजेचे आहे. हमी भाव ठरवितांना शेतमालासाठी आलेला एकरी खर्च प्रत्यक्ष वातावरणातील बदल आणि झालेले नुकसान याचा विचार करुनच ठरविण्यात आला पाहिजे.

सध्या पावसाने विश्रांती घेतलेली असल्याने सर्वत्र शेतीकामांना वेग आल्याचे दिसत आहे. कांदा लागवड, द्राक्षबागेतील डिपिंगची कामे, सोयाबीन, मका सोंगणी आणि ती सुरक्षित ठिकाणी वाहून नेतांना शेतकरी दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या