डौले हॉस्पिटलला सव्वा लाखाचा दंड

by

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रुग्णाच्या पोटातील गाठ न काढताही डिस्चार्ज कार्डवर गाठ काढल्याचा उल्लेख करून दिशाभूल केली व योग्य वैद्यकीय सल्ला दिला नाही म्हणून झालेल्या शारीरिक व मानसिक मनस्तापामुळे तक्रारदार रुग्णाला एक लाख 20 हजार रुपये देण्याचा आदेश ग्राहक आयोगाने डौले हॉस्पिटलच्या डॉ. ज्योत्सना पी. डौले यांना दिला. याबाबत अलमास अनिस शेख यांनी ग्राहक आयोगाकडे तक्रार केली होती.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष विजय प्रेमचंदानी, सदस्या श्रीमती चारू डोंगरे व सदस्य महेश ढाके यांनी नुकताच हा आदेश दिला. आदेशाची पूर्तता करून दंडाची रक्कम 30 दिवसांच्या आत द्यावी असेही आयोगाने बजावले आहे. नगर येथील अलमास शेख यांनी पोटात दुखत असल्याने ऑक्टोबर 2009 साली डौले हॉस्पीटलमध्ये तपासणी केली. उपचार करूनही पोटदुखी वाढतच गेली. त्यानंतर दुसर्‍या डॉक्टरकडे तपासणी करण्याचा सल्ला दिला.

तेथे सोनेग्राफी केल्यानंतर शेख यांच्या दोन्ही ओवरीवर गाठ असल्याचे निदर्शनास आले. म्हणून शेख यांनी पुन्हा डौले हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारणा केली. शेख यांनी 29 डिसेंबर 2009 रोजी पुणे येथील हॉस्पिटलमध्ये तपासणी करून डौले हॉस्पिटलमधील ऑपरेशनचे रिपोर्ट व ऑपरेशनची सीडी दाखवली. गाठ न काढता डॉ. डौले यांनी डिसचार्ज कार्डवर गाठ काढली असा उल्लेख केला होता. हे समजल्यावर शेख यांना धक्का बसला. म्हणून त्यांनी भरपाईसाठी ग्राहक आयोगामध्ये तक्रार केली होती.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *