Friday, April 26, 2024
Homeनगरडोंगरगण परिसरातील सर्वच पिके पाण्यात

डोंगरगण परिसरातील सर्वच पिके पाण्यात

अहमदनगर |वार्ताहर| Ahmednagar

तालुक्यातील डोंगरगण येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे परिसरातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन

- Advertisement -

मदत मिळण्याची मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे. चालू वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच डोंगरगण परिसरात जोरदार पाऊस झालेला आहे. सरासरीपेक्षा पाऊस खुपच जास्त झाल्याने परिसरातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. सुरुवातीच्या पावसाने मुग, सोयाबीन, बाजरी व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सद्यपरिस्थितीत शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची लागवड केलेली आहे. परंतु सततच्या जोरदार पावसाने कांदा पिकांना विविध रोगांनी ग्रासले आहे. कांद्याच्या पिकात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचलेले आहे.

कांदा पिकांवर सड, बुरशी, पिळकावण्या, हुमणी अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. कांदा पिकाची वाढ खुंटलेली आहे. वापसा होत नसल्याने शेतीच्या मशागतीची कामे खोळंबली आहेत. ज्वारीची पेर लांबणीवर गेली आहे.

लाल कांद्याचे बियाणे 7 ते 8 हजार रुपये पायली तर गावरान कांद्याचे बियाणे 10 ते 12 हजार रुपये पायलीने खरेदी करुन शेतकर्‍यांनी कांद्याची रोपे टाकली होती. परंतु अतिवृष्टी मुळे रोपेही वाया गेली. काही शेतकर्‍यांनी तर विकतचे रोपं घेऊन कांद्याची लागवड केली. परिसरात पडत असलेल्या जोरदार पावसाने सर्वच पिकांचे नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन आर्थिक मदत मिळावी अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांकडून होत आहे.

चालू वर्षी सर्वत्र झालेल्या जोरदार पावसाने शेतकर्‍यांच्या सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. डोंगरगण परिसरातील शेतकरी तर मेटाकुटीला आला आहे. अतिवृष्टीने शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. ओला दुष्काळ जाहिर करावा तसेच नुकसानीचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळावी.

– कैलास पटारे, (सरपंच, डोंगरगण)

- Advertisment -

ताज्या बातम्या