Thursday, April 25, 2024
Homeधुळेपोलिसांच्या ताब्यात होता, मग मृत्यू झाला कसा ?

पोलिसांच्या ताब्यात होता, मग मृत्यू झाला कसा ?

दोंडाईचा – Dondaicha – श.प्र./वि.प्र :

शहरातील चोरीच्या संशयाने ताब्यात घेतलेल्या एका तरुणाचा संशयीतरित्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

दिवसभर पोलीसांच्या ताब्यात असलेला हा तरुण सायंकाळी शहादा रस्त्यावरील पिरबर्डी नजीक मृतावस्थेत आढळून आला.

यामुळे त्याचे नातेवाईक व समाज बांधव कमालीचे संतप्त झाल्याने बुधवारी रात्री काही काळ तणाव निर्माण झाला. इन कॅमेरा शवविच्छदनासह या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होते आहे.

काही दिवसांपूर्वी दोंडाईचा शहरात तांदळाच्या गोण्या चोरीस गेल्या. यासंदर्भात दाखल झालेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी यापुर्वीच तीन जणांना अटक केली आहे.

मात्र याच प्रकरणातील संशयीत म्हणून मोहन सदाशिव मराठे (वय 36) यास बुधवारी तपासासाठी ताब्यात घेतले.

आपल्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती त्याची आई शोभाबाई मराठे (वय 60) त्यांनी पोलीस ठाण्यात जावून विचारणा केली असता पोलिसांनी उडवा उडवीचे उत्तरे देवून मुलाची भेटही होवू दिली नाही.

अखेर शोभाबाई यांनी माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते विजय मराठे यांच्याकडे जावून ही घटना सांगितली.

सायंकाळी 5.30 ते 6 वाजेच्या सुमारास विजय मराठे यांनी पोलीस ठाण्यात जावून याबाबत विचारणा केली.

त्यावेळी त्यांना मोहन मराठे यास वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आल्याचे सांगून त्यांचीही भेट नाकारली. त्यामुळे श्री.मराठे हे पोलीस ठाण्यातून परतले.

संशयास्पद मृत्यूने खळबळ

श्री.मराठे हे पोलीस ठाण्यातून परतल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच एक तरुण पिर बर्डी परिसरात मृतावस्थेत पडून असल्याची माहिती.

त्यांनी तत्काळ तिकडे धाव घेतली. हा मृतदेह मोहन मराठे याचा असल्याचे स्पष्ट झाले. तोवर आणखी काही तरुणांची व समाजबांधवांची घटनास्थळी गर्दी झाली.

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मोहन मराठेचा मृत्यू झाला कसा? त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली? मग त्यास नेमके कोणी मारले असावे? असे विविध प्रश्न उपस्थित करत पोलिसांवरही संशय घेण्यात आला.

पोलिसांचा ताफा दाखल

या घटनेची माहिती सहाय्यक पोलीस निरिक्षक पंजाबराव राठोड यांना कळविण्यात आली. ते लवकर येत नसल्याचे बघून पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधण्यात आला.

उशिराने पोलीस फौजफाट्यासह दाखल झाले. नातलगांनी प्रारंभी मृतदेह उचलण्यास विरोध केला. नंतर पोलिसांच्या मध्यस्थीने उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह आणण्यात आला.

बुधवारी रात्री पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, परिविक्षाधीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, विभागीय पोलीस अधिकारी अनिल माने, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, शिरपूरचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शिंदखेड्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, उपनिरीक्षक मनोज वळवी तसेच अतिरिक्त पोलिस दलाचे पथक दोंडाईचात दाखल झाले.

कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याची त्यांनी खबरदारी घेतली. ही घटना यापुर्वी दोंडाईचात घडलेल्या योगेश धनगर प्रकरणासारखी तर नाही ना? अशीही शंका घेण्यात येत आहे.

अर्थात मृत मोहन मराठे याची हत्या की आत्महत्या यातील गूढ तपास यंत्रणेने उकल करावी, अशी मागणी सर्वच स्तरातून होते आहे.

पुन्हा योगेश धनगर ?

दोंडाईचा शहरात सहा वर्षांपुर्वी घडलेल्या घटनेत तक्रारीपोटी पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला.

योगेश धनगर असे या मृत तरुणाचे नाव होते. त्यास पोलिसांनी जबर मारहाण केली. शिवाय विजेचे शॉक दिले.

यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने राज्यभर गाजलेला हा विषय मानवाधिकार आयोगापर्यंत पोहचला.

यावर चौकशी समिती नेमली गेली. तक्रारीत तथ्य आढळून आल्याने दोंडाईचा पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक निरिक्षक प्रकाश महाजन यांच्यासह दोन अधिकारी निलंबित झाले तर काही कर्मचार्‍यांवर कारवाई झाली.

पुन्हा याच प्रकरणाची पुनरावृत्ती तर नाही? असा सवाल दोंडाईचा शहरात उपस्थित केला जातो आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या