Friday, April 26, 2024
Homeधुळेशेतकर्‍याच्या अपघाती मृत्यूनंतर रास्तारोको

शेतकर्‍याच्या अपघाती मृत्यूनंतर रास्तारोको

दोंडाईचा – Dondaicha – श.प्र :

राज्य महामार्ग क्रमांक सहावर आज पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास भरधाव वाहनाच्या धडकेत धावडे गावातील शेतकरी जागीच ठार झाला.

- Advertisement -

त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रास्तारोका आंदोलन सुरू केले. अप्पर तहसीलदार सुदाम महाजन व पोलिसांनी घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांची समजूत काढली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

राजेंद्र लोटन पाटील (वय 50 रा. धावडे ता. शिंदखेडा) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. ते नंदुरबार रस्त्यावर नेहमीप्रमाणे पहाटे गुरांच्या गोठ्यात साफसफाई करून गुरांचे गोबर, मलमूत्र फेकण्यासाठी उकीरड्यावर जात असतांना त्यांना भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात ते जागीच ठार झाले.

मात्र अपघातानंतर वाहनचालक पसार झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष लोले, उपनिरीक्षक देविदास पाटील आदीसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेमुळे काही काळ गावात तणावाचे वातावरण होते.

घटनेची माहिती मिळताच अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांनी घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांना समजविण्याचा प्रयत्न केला.

रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यात आली. तसेच अपघातप्रकरणी अज्ञात वाहनचालकाचा विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन

राज्य महामार्गावर नेहमीच अपघात होत असतात. त्यामुळे रस्त्यावर आजच गतिरोधक बांधण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली.

तसे निवेदन अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांना दिले. श्री. महाजन यांनी निवेदनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम उपविभाग दोडाईचा येथील अभियंत्यांना बोलावून रस्त्यावर गतीरोधक बांधण्याचे आदेश दिले.

दुपारी दोन वाजेपर्यंत गतीरोधकाचे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ग्रामस्थांना देण्यात आले.

त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी सरपंच रतिलाल पाटील, अँड. ज्ञानेश्वर पाटील, प्रकाश पाटील, सचिन मासुळे, योगेश पाटील, प्रविण पाटील, आनंदा देवरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या