Tuesday, April 23, 2024
Homeशब्दगंधआनंदाचे डोही...

आनंदाचे डोही…

भेदाभेद अमंगळ! ही भागवत धर्माची परंपरा. निव्वळ हरिनामाने हजारो दु:खे दूर होतात. संकटे नष्ट होतात ही तीव्र भावना आहे वारीमागची. सावळा विठ्ठल किंवा विठोबा हे दैवत. त्याच्या पायाशी कोणताच भेद नाही. सर्वसमावेशकत्वाची व्याप्ती सांगणारी वारी ही विलक्षण अशी आध्यात्मिक पदयात्रा आहे. वारीला प्राचीन अथवा आधुनिकतेत आपण बांधू शकत नाही. कारण ती नित्यनवीन आहे. मुळातच वारीमागची संकल्पना सर्वव्यापी आणि कालातीत आहे. म्हणूनच ती आजही प्रिय आहे.

वारी सुरू झाली. मागील दोन वर्षे करोनाच्या सावटामुळे वारी निघाली नाही. आज वातावरण काही प्रमाणात संकटमुक्त झाले आहे. त्यामुळे विठुरायाच्या दर्शनाला वारकरी मंडळी मोठ्या उत्साहाने निघाली आहेत. किती वर्षांचा इतिहास आहे, वारीला! वर्षे मोजू नयेत, कारण ‘पुण्याची गणना कोण करी!’ असे प्रत्यक्ष हरिपाठात म्हटले जाते. म्हणून वारी कधी सुरू झाली? कोणी सुरू कोणी? हा प्रश्न विचारूच नये. त्याची जाणीव करुन घ्यावी!

आपल्या संतमंडळींनी भागवत धर्माचा झेंडा उभारला. भेदाभेद अमंगळ! ही भागवत धर्माची परंपरा. निव्वळ हरिनामाने हजारो दु:खे दूर होतात. संकटे नष्ट होतात ही तीव्र भावना आहे वारीमागची.

- Advertisement -

सावळा विठ्ठल किंवा विठोबा हे दैवत. त्याच्या पायाशी कोणताच भेद नाही. सर्वसमावेशकत्वाची व्याप्ती सांगणारी वारी ही विलक्षण अशी आध्यात्मिक पदयात्रा आहे. वारीला सामाजिक, धार्मिक परंपरा आहे. वारीचा उद्देश फक्त देवदर्शन हाच नाही, तर सर्व समाजातील, सर्व स्तरातील स्त्री-पुरुषांना एकत्र आणणे ही त्यामागची भावना आहे. वारी ही आनंदयात्रा आहे. वारीची सुरुवात झाली तो काळ फारसा अनुकूल नव्हता. परकीय आक्रमणे होती. समाजात अस्थिरता होती. राज्य सुरक्षित नव्हते. दारिद्य्र प्रचंड होते! आपापसात अविश्वासाचे वातावरण होते. या सर्वांचा विचार त्या-त्याकाळातल्या संतांनी केला. या अशा परिस्थितीत भेदाभेद अमंगल या ब्रीदवाक्याने वारीची योजना केली गेली असावी. या वारीने समाजाला एकत्र आणले! एकत्र बांधून ठेवले! पंढरपूरच्या विठोबाला साकडे घालीत वारीला रूपे दिली! अशी वारी सुरू झाली.

वारीत सहभागी होतात ते वारकरी! दैवत होते विठोबा! सावळ्या विठ्ठलाने कोणताही भेदाभेद न करता सर्वांना आश्वासक करत आपल्या जवळ घेतले. सुरुवातीला पायी वारी जरी होती तरी वाट दुर्गम होती, दुष्काळ होता. दारिद्य्र होते. सामाजिक, राजकीय परिस्थिती प्रतिकूल होती. पण समाजात, जनमानसात वारी रूजत गेली, श्रद्धा, भक्ती वाढत गेली, तसतशी वारी सुकर झाली. लोकांच्या हृदयाचा ठाव घेेत वाढती झाली. मनामनांतील संवेदनशीलता अधिकाधिक हळवी करत प्रत्येक वारकरी पंढरपूरच्या विठोबाशी नम्र, लीन, होत गेला. अशी ही वारीची कल्पना मला पटली ती मी तुमच्यासमोर उलगडली.

‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असे तुकाराम महाराजांनी रचले ते वारीला पाहूनच असावे, असे वाटते. वारकर्‍यांना पाहून कोणाही मनाला विलक्षण आनंद होतो. टाळ-चिपळ्यांच्या गजराने आणि विठुरायाच्या नामघोषाने भारावून जायला होते. यंदाच्या वर्षी वारीतील उत्साह हा निश्चितच द्विगुणित झालेला आहे.

वारी नित्यनवीन आहे. मुळातच वारीमागची संकल्पना सर्वव्यापी आणि कालातीत आहे. म्हणूनच ती आजही प्रिय आहे. ती एक संवादिनी आहे.

महिना-दीड महिन्याच्या या पदयात्रोत सर्वजण सामावून जातात. आबालवृद्धसुद्धा आनंदाने सहभागी होतात. पांढरे धोतर, अंगात बंडी, डोक्यावर पांढरी टोपी, हातात टाळ, कपाळावर टिळा आणि गळ्यात तुळशीमाळा घालून हातात वीणा घेतलेला वारकरी आत्ममग्न होऊन नामस्मरणात दंग होऊन वारीत पावली नृत्य करताना पाहतो तेव्हा मनाला होणारा आनंद अवर्णनीय असतो. वारकर्‍यांचे नृत्य एका तालात असते. वारीत सहभागी झालेल्या स्त्रियांचे चेहरे कधी निरखून पाहिल्यास त्यावरील भावही एकसारखेच असतात. कारण सकारात्मक ऊर्जेचा तो एक मोठा स्त्रोत असतो. अखंड जनसमुदाय, अपार गर्दी तरीही एक सुरक्षिततेची भावना तिथे असतेच असते. काही वारकरी भगिनींशी बोलल्यावर त्या म्हणाल्या की, वारीत आपले अस्तित्व विसरायला होते. मोठेपणा गळून पडतो. शेवटच्या दिवशी गळाभेट देऊन निरोप देताना आपण एकच आहोत ही भावना दृढ होते.

आणखी बोलकी प्रतिक्रिया होती एका अद्ययावत तरुणीची. ती म्हणते, वारीच्या संपूर्ण प्रवासकाळात मोबाईची आठवण एकदाही आली नाही. वारीत सहभागी होताना मी घरच्यांना सांगितले होते. आता भेट वारीनंतरच. मध्ये फोनच करायचा नाही.

या अनुभवावरून एक लक्षात आले की, खरेच हे होऊ शकते. आज मोबाईलमुळे संवाद संपत आलाय. घराघरांत दुरावा निर्माण झालाय. प्रेम आहे पण संवाद नाहीये. असे संवाद नसल्याचे प्रदूषण कोणत्याही प्रकारच्या प्रदूषणापेक्षा जास्त हानिकारक आहे. आज आपण सतत ‘पर्यावरण वाचवा, समाज वाचवा’ असा नारा देत असतो. पण समाज कुटुंबामुळेच टिकेल आणि कुटुंब संवादामुळे टिकेल. असे हे एकमेकांशी जोडलेपण आहे. तेच महत्त्वाचे आहे आणि वारी समाजाला, कुटुंबाला जोडणारी आहे.

आपले कोणतेही सण, समारंभ नेहमी कुटुंबाला, समाजाला, परस्पर संबंधाला समोर ठेवूनच आखले गेेेलेले आहेत.

आज नव्याने विचार करू जाता यामागील भूमिका स्पष्ट होताना दिसते. महाराष्ट्राचे लाडके दैवत पंढरपूरचे श्री विठ्ठल! हे जणू सर्वांचे आराध्य आहे. संतांनी त्याला मायबापाची विशेषणे लावली आहेत आणि ते खरेच ‘विठू माझा लेकुरवाळा’ याला योग्य आहेत. यावर्षीच्याच उत्साहाने दरवर्षी वारी घडू दे, अशी विठुरायाच्या चरणी प्रार्थना!

- Advertisment -

ताज्या बातम्या