लोकनेते घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्याचा गाळपाचा नवा उच्चांक

jalgaon-digital
3 Min Read

भेंडा |वार्ताहर| Bhenda

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि. 3 मे रोजी 190 दिवसांत 15 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून गाळपातील नवा उच्चांक प्रस्थापित केला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी दिली.

श्री.घुले म्हणाले, लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली नेवासा तालुक्यातील भेंडा येथे 19 ऑक्टोबर 1970 मध्ये प्रतिदिन 1250 मेट्रिक टन ऊस गाळप क्षमता असलेल्या ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाली. 17 मे 1975 रोजी चाचणी गळीत हंगाम शुभारंभ झाला. त्यानंतर सातत्याने गाळप क्षमतेत वाढ करण्यात आली. सन 1982-83 मध्ये 1250 वरून 2000 मेट्रिक टन, सन 1989-90 मध्ये 2000 वरून 3000 मेट्रिक टन, सन 2000-2001 मध्ये 3000 वरून 5000 मॅट्रिक टन, सन 2007-08 मध्ये 5000 वरून 6000 मॅट्रिक टन आणि सन 2017-18 मध्ये 6000 वरून प्रतिदिन 7000 मेट्रिक टन गाळप क्षमतेची विस्तारवाढ करण्यात आली होती.

ऊस गाळप व साखर उत्पादनाबरोबरच पूरक उद्योगही सुरू करण्यात आले. त्यात प्रतिदिन 45 हजार लिटर उत्पादन क्षमतेची डिस्टिलरी, 50 हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल निर्मिती प्रकल्प, 31.5 मेगावॉट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प इत्यादी प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. हे सर्व पूर्ण क्षमतेने सुरू आहेत.

वीज निर्मिती व निर्यात..

या हंगामात दि.2 मे अखेर 12 मेगावॉट व 19.5 मेगावॉट क्षमतेच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून 10 कोटी 29 लाख 23 हजार 133 युनिट वीज निर्मिती करून 6 कोटी 29 लाख 24 हजार 440 युनिट वीज महावितरण कंपनीला निर्यात केली आहे.

अल्कोहोल व इथेनॉल निर्मिती…

दि. 2 मे अखेर 45 हजार लिटर प्रतिदिन क्षमतेच्या डिस्टिलरी मधून 89 लाख 10 हजार लिटर अल्कोहोल निर्मिती झाली. तसेच 50 हजार लिटर प्रतिदिन क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पातून 75 लाख 36 हजार 883 लिटर इथेनॉल निर्मिती करण्यात आली आहे.

15 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप कारखाना स्थापनेपासून हे सर्वात उच्चांकी गाळप आहे. या नवीन उच्चांकाबद्दल कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार डॉ.नरेंद्र घुले पाटील, संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, ज्येष्ठ संचालक अ‍ॅड. देसाई देशमुख, तज्ञ संचालक डॉ. क्षितिज घुले पाटील, कामगार संघटनेचे सरचिटणीस नितीन पवार, कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष व कामगार संचालक सुखदेव फुलारी यांनी कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सचिव रवींद्र मोटे, तांत्रिक सल्लागार एम. एस. मुरकुटे, एस. डी. चौधरी, चीफ इंजिनिअर राहुल पाटील, शेतकी अधिकारी सुरेश आहेर यांचेसह कारखान्याचे अधिकारी, इंजिनिअर्स, मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट्स व सर्व कामगार, ऊस तोडणी व वहातूक मजूर यांचे अभिनंदन केले आहे.

ऊस गाळप-साखर निर्मिती

सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 या गळीत हंगामात ज्ञानेश्वर कारखान्याने दि. 3 मे अखेर 15 लाख 600 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 13 लाख 18 हजार 500 क्विंटल पक्की साखर व 1 लाख 48 हजार 250 क्विंटल कच्ची (रॉ) साखर निर्मिती केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *