दिवाळीचा बाजार बहरला…

अहमदनगर | प्रतिनिधी

मागील वर्षी करोनाचे (COVID19) गडद सावट असलेला दिवाळ सण यंदा बऱ्यापैकी उत्साहात साजरा होणार असल्याचे संकेत बाजारातील गर्दी देत आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे, पूजेचे साहित्य, रंगरंगोटी, आकशदिवे, पणत्या, लाईटच्या माळा आदींच्या खरेदीसाठी शहराबरोबरच उपनगरातील दुकाने बहरली आहेत.

देशातील सर्वांत मोठा सण असलेल्या दीपावलीचा (Dipawali) आज पहिला दिवस, मागील वर्षी करोनाच्या धुमाकुळामुळे सारेच जनजीवन ठप्प झाले होते. अनेकांचे उद्योग धंदे, नोकऱ्या यावर त्याचा विपरित परिणाम झाला. नागरिकांना सण उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते. दिवाळी सणही गेल्या वर्षी करोनाच्या संकटाखाली होता. त्यामुळे गेल्या वर्षी या सणात उत्साह नावालाच होता. आता मात्र करोना परिस्थिती सावरली आहे. मागील वर्षी हजारोंच्या संख्येत असलेली रुग्णांची संख्या शंभराच्या आसपास आहे. सर्वच क्षेत्रातील व्यवहार बऱ्यापैकी सुरळीत झाल्याने त्याचा सकारात्मक परिणाम बाजारात दिसत आहे.

कपडे खरेदीसाठी मुख्य शहरातील कापडबाजार, गंजबोजार, मोची गल्लीबरोबरच उपनगरातील दुकानांतही शनिवार-रविवारच्या सट्टामुळे चांगली गर्दी होती. लहान मुलांबरोबरच थोरा-मोठ्यांसाठी कपडे खरेदी झाली. तयार कपड्यांना चांगली मागणी आहे.

पूजनासाठी लागणारी मूर्ती, लक्ष्मी (झाडणी), बोळके, त्याबरोबरच सुगंधी साबण, उटणे यांचीही दुकाने रस्त्यावर चौकाचौकात थाटली आहेत. दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर विविध गृहपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहने व फर्निचरची खरेदी केली जाते. त्याचीही बुकिंग नागरिकांकडून होत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी संबंधित कंपनी व विक्रेत्यांकडून विविध ऑफर दिल्या जात आहे. घराच्या अंगणात काढण्यात येणाऱ्या रांगोळीला सण-उत्सवांत महत्त्वाचे स्थान आहे. त्यासाठी विविध रंगांतील रांगोळी, छापे, पेन आदींच्या दुकानात महिलावर्गाची गर्दी आहे.

विविध आकारातील बहुरंगी पणत्या बाजारात आल्या आहेत. अनेक मोठ्या दुकानांबरोबरच रस्त्यावरील स्टॉलवर या पणत्यांची खरेदी होत आहे. आकाश कंदीलामध्येही अनेक प्रकार व कल्पकता वापरून केलेल्या डिझाईन्सने ग्राहकांना आकर्षित केले आहे. घरावर, अंगणातील झाडांवर, दुकानांवर रोषणाई करण्यासाठी लाईटच्या रंगीबेरंगी माळा हव्यातच. त्यासाठी स्थानिक उत्पादीत माळांबरोबरच चिनी माळांनाही चांगली मागणी आहे. करोनाचा कहर कमी झाल्याने यंदाची दिवाळी उत्साहात साजरी होणार असल्याने ग्राहकांबरोबरच व्यावसायिक समाधानी होतील असा अंदाज बाजारात होत असलेल्या गर्दीवरून लावला जात आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *