Saturday, April 27, 2024
Homeनाशिकअधिकारी मुख्यालयी थांबत नसल्याने विभागीय आयुक्तांची नाराजी

अधिकारी मुख्यालयी थांबत नसल्याने विभागीय आयुक्तांची नाराजी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

तालुकास्तरावरील गटविकास अधिकारी व सहाय्यक गटविकास अधिकारी मुख्यालयी थांबत नाहीत.ही बाब विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी याबाबतची खुली नाराजी व्यक्त करत जिल्हा परिषदेला तसे कळविले होते.

- Advertisement -

याची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी तात्काळ दखल घेत गटविकास अधिकार्‍यांसह तत्सम अधिकार्‍यांना पत्र देऊन मुख्यालयी थांबा, असे आदेश काढले आहे.पाहणी अथवा भेटी दरम्यान अधिकारी गैरहजर असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

विभागीय आयुक्त गमे यांनी जिल्हा परिषदेला पत्र देत नाराजी कळविली होती. विभागातील बरेच अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत. त्यामध्ये जिल्हा परिषद , अंतर्गत कार्यरत गट विकास अधिकारी व सहाय्यक गट विकास अधिकारी हे जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी राहुन तेथुन ये- जा करत असल्याचे समोर आले आहे.

विभागीय प्रशासनावर घट्ट पकड ठेवण्यासाठी तसेच प्रशासकीय कार्यालयातील कामकाज जलद गतीने पार पाडण्यासाठी अधिकारी व सेवकांनी त्यांच्या मुख्यालयी मुक्कामी राहणे आवश्यक आहे . जेणेकरून संबंधित क्षेत्रातील गावाना भेटी देणे, विविध उपक्रम राबविणे, शासनाचे जे अभियान चालु आहेत. त्यात सक्रीय सहभाग घेणे हे सर्व कामे तसेच ग्रामीण भागातील जनता,शेतकर्‍यांना भेटी देणे त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्या सोडविणे यासाठी अधिकार्‍यांनी मुख्यालयी हजर राहणे आवश्यक आहे. परंतू, विभागीय आयुक्त गमे यांच्या भेटी दरम्यान अधिकारी मुख्यालयी नसल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय दौर्‍यात आलेल्या अनेक बाबी विभागीय आयुक्तांना जिल्हा परिषदेला कळविल्या आहेत.

कारवाईचा प्रस्ताव देणार

विभागीय आयुक्त गमे यांच्या पत्राची दखल घेत, मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांनी गटविकास अधिकार्‍यांना पत्र काढले. यात अधिकार्‍यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. जे अधिकारी मुख्यालयी आढळणार नाही त्यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर केला जाईल, असा इशारा पत्रात दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या