Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरलाच प्रकरणी 'त्या' पोलिसांचे निलंबन

लाच प्रकरणी ‘त्या’ पोलिसांचे निलंबन

अहमदनगर|Ahmedagar

पकडलेली वाळूची ट्रक सोडून देणे व वाळू वाहतुकीसाठी ट्रक चालून देण्यासाठी 15 हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी शेवगाव पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या पथकातील तिघा पोलिसांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्या पोलिसांचे निलंबन केले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. ही चौकशी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल करणार असल्याची माहिती अधीक्षक पाटील यांनी दिली.

- Advertisement -

वसंत कान्हु फुलमाळी (रा. शंकरनगर, पाथर्डी) संदिप वसंत चव्हाण (रा. पोलीस वसाहत, शेवगाव), कैलास नारायण पवार (रा. शंकरनगर, पाथर्डी) असे निलंबित केलेल्या तिघांची नावे आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघे पसार झाले आहे. यातील वसंत फुलमाळी हा उपअधीक्षक मुंढे यांचा वायरसेस ऑपरेटर आहे. नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.

नगर जिल्ह्यातील वाळूचे लिलाव झालेले नाहीत. त्यामुळे अनेक कंत्राटदार बीड जिल्ह्यातून वाळू आणत आहेत. असेच एक वाळूची वाहतूक करणारी ट्रक उपअधीक्षक मुंढे यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकातील तिघा पोलिसांनी 7 एप्रिल रोजी पकडली होती. ती ट्रक कारवाई न करता सोडून देण्यासाठी आणि पुढे हा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी 15 हजार रुपये लाचेची मागणी या पोलिसांनी कंत्राटदाराकडे केली. मात्र, पाथर्डी येथील कंत्राटदाराने यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. सोबत रेकॉर्डिंगचे पुरावेही दिले. लाचलुचपत विभागाने केलेल्या लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान वरील नमूद तिन्ही पोलिसांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती 15 हजार रूपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली. लाच मागितल्याचा पुरावा एसीबीच्या अधिकार्‍यांना मिळाल्यानंतर त्यांनी सोमवारी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच अधीक्षक पाटील यांनी तिघांना निलंबित केले आहे. पोलीस दलासह सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेल्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अपर अधीक्षक अग्रवाल हे करणार आहे. यामुळे यात अजून कोणाची नावे समोर येतात का? हे चौकशी झाल्यानंतर समोर येणार आहे.

उपअधीक्षक मुंढे यांची चौकशी होणार

शेवगावचे उपअधीक्षक मुंढे यांच्या विशेष पथकातील तीन कर्मचार्‍यांनी लाच मागितल्याने उपअधीक्षक मुंढे अडचणीत आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस खात्याअंतर्गत चौकशी होणार आहे. तसेच लाचलुचपत विभागाचे तपासी अधिकारी हे उपअधीक्षक मुंढे यांची चौकशी करणार आहे. त्यांना कार्यालयात चौकशीसाठी बोलविले जाईल, अशी माहिती लाचलुचपतचे उपअधीक्षक हरीष खेडकर यांनी दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झालेल्या पोलिसांना शोधण्यासाठी आमचे पथक काम करत आहे. त्यांच्या घराची देखील झडती घेण्यात आली असल्याचे उपअधीक्षक खेडकर यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या