Sunday, April 28, 2024
Homeनगरप्रशिक्षण केंद्राचा लोकप्रतिनिधी-अधिकार्‍यांना फायदा

प्रशिक्षण केंद्राचा लोकप्रतिनिधी-अधिकार्‍यांना फायदा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुक्यातील अकोळनेर येथे राज्यातील दुसरे जिल्हा पंचायत प्रशिक्षण केंद्र (संसाधन केंद्र) साकारत असून याद्वारे स्थानिक

- Advertisement -

स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी, कर्मचार्‍यांना उत्कृष्ट पद्धतीचे प्रशिक्षण मिळणार आहे. त्यातून त्यांची क्षमतावृद्धी होऊन त्याचा फायदा विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी होईल, असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

अकोळनेर येथे जिल्हा पंचायत संसाधन केंद्र (डीपीआरसी) इमारतीचे भूमिपूजन सोमवारी (दि. 25) मुश्रीफ यांच्याहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले होत्या. आ. निलेश लंके, उपाध्यक्ष प्रताप शेळके, सभापती सुनील गडाख, काशिनाथ दाते, मीरा शेटे, उमेश परहर, जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, कैलास वाकचौरे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले, सिंधुदुर्गनंतर हे राज्यातील दुसरे केंद्र असून याद्वारे ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेमधील लोकप्रतिनिधी, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकारी व कर्मचार्‍यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आहेत, त्याची आपल्या संस्थेत कशी अंमलबजावणी करता येईल, त्यासाठी पाठपुरावा कसा करावा, योजनांची तरतूद कशी असते

सह विविध विकासकामे कशी पूर्णत्वास न्यायची असे प्रशिक्षण या केंद्रातून मिळेल. त्यातून लोकप्रतिनिधींमध्ये नक्कीच क्षमतावृद्धी होऊन कामे मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक जिल्ह्यात असे केंद्र असणे गरजेचे असून त्यासाठी सूचना देणार असल्याचेही मुश्रीफ म्हणाले.

राजश्री घुले यांनी केंद्राविषयी सांगताना जिल्हा परिषदेनेही सेसमधून 50 लाखांची तरतूद केल्याचे नमूद केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) निखिलकुमार ओसवाल, वासुदेव सोळंके, शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे आदींनी परिश्रम घेतले. अडीच कोटी खर्चाचे हे केंद्र अकोळनेर येथे सुमारे 2 हेक्टर जागेत साकारणार आहे. 100 आसन क्षमतेचे दोन प्रशिक्षण हॉल, त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात येथे प्रशिक्षणार्थींच्या निवासाचीही सोय होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या