Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्हा मजूर फेडरेशन निवडणूक : ‘आपलं’पॅनलला तीन तर ‘सहकार’ला दोन जागा

जिल्हा मजूर फेडरेशन निवडणूक : ‘आपलं’पॅनलला तीन तर ‘सहकार’ला दोन जागा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जिल्हा मजूर फेडरेशनच्या संचालकपदासाठी( District Labor Federation Election) अतिशय प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणुकीत सिन्नरमध्ये आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांना त्यांचे लहान बंधू भारत कोकाटे यांनी माजी आमदार राजाभाऊ वाजे व उदय सांगळे यांच्या सहकार्याने जोरदार धक्का दिला. तसेच येवल्यात माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या गटाने आमदार बंधू नरेंद्र दराडे व किशोर दराडे यांना मोठा धक्का दिला. चांदवडमध्ये माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या गटाने विजयश्री खेचून आणत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

- Advertisement -

या निवडणुकीत फेडरेशनवर वर्चस्व राखलेल्या राजेंद्र भोसलेप्रणीत आपले पॅनलला तीन तर भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर व संपतराव सकाळेप्रणीत सहकार पॅनलने दोन जागांवर विजय संपादन केला.नाशिक तालुका संचालकपदी सतत तीन पंचवार्षिक निवडून येणारे योगेश (मुन्ना) हिरे यांना मतदारांनी धक्का दिल्याने पराभवाचे धनी व्हावे लागले. त्यांचा शर्मिला कुशारे यांनी 16 मतांनी पराभव केला.

मजूर फेडरेशनच्या संचालकपदाच्या 12 जागांसाठी सोमवारी (दि.26) काशीमाळी मंगल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश महंत यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली.चार टेबलांवर सात तालुका संचालक व पाच जिल्हा संचालकपदासाठी एकत्रित मतमोजणी झाली. महंत यांनी विजयी उमेदवारांची घोषणा करत त्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले.

संचालकपदांच्या निवडणुकीसाठी तीन पॅनल रिंगणात होते. फेडरेशनवर वर्चस्व असलेले राजेंद्र भोसले यांनी आपली ताकद आपलं पॅनलच्या मागे लावली होती. त्यांच्या पॅनलच्या महिलांसाठी राखीव असलेल्या दोन जागांवर दीप्ती पाटील व कविता शिंदे या दोन महिला, तर अनुसूचित जाती-जमाती गटातून शशिकांत उबाळे यांनी बाजी मारली.सहकार पॅनलकडून इतर मागास प्रवर्गासाठी राखीव जागेकरता निवडणूक रिंगणात असलेले अर्जुन केरू चुंभळे व एन. टी. राखीव गटातून माजी चेअरमन राजाभाऊ खेमनार यांनी बाजी मारली. या पॅनलचे अनुसूचित जाती- जमाती गटातील किरण निरभवणे यांना मात्र अवघ्या 13 मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. तर परिवर्तन पॅनलला एकही जागा मिळवता आली नाही.

भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांचे वर्चस्व असलेल्या देवळा तालुका संचालकपदासाठी तीन उमेदवार रिंगणात होते. मात्र, निकाल पाहता ही निवडणूक एकतर्फीच झाल्याचे स्पष्ट झाले. येथून विद्यमान संचालक सतीश सोमवंशी 45 पैकी 44 मते मिळवत विजयी झाले. पेठ तालुक्यातून सुरेश भोये यांनी अकरापैकी सहा मते घेत विजय मिळवला. सुरगाणा तालुक्यातून राजेंद्र गावित यांनी 12 मते मिळवत विजय प्राप्त केला. नाशिक तालुका संचालकपदाच्या निवडणुकीत शर्मिला कुशारे यांनी योगशे हिरे यांचा 16 मतांनी पराभव केला. कुशारे यांना 85 तर हिरे यांना 69 मते मिळाली.

बिनविरोध निवड झालेले तालुका संचालक

संपतराव सकाळे (त्र्यंबकेश्वर), राजेंद्र भोसले (मालेगाव), रोहित पगार (कळवण), शिवाजी रौंदळ (सटाणा), अमोल थोरे (निफाड), प्रमोद मुळाणे (दिंडोरी), प्रमोद भाबड (नांदगाव), ज्ञानेश्वर लहांगे (इगतपुरी).

विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते

इतर मागासवर्गीय प्रवर्ग : अर्जुन चुंभळे (382) विजयी, पवन आहिरराव (309), संदीप थेटे (312), मिलिंद रसाळ (2).

अनुसूचित जाती-जमाती : शशिकांत उबाळे (404) विजयी, किरण निरभवणे (390), हेमंत झोले (28), उत्तम भालेराव (15), रविकांत भालेराव (145), अशोक रोकडे (10).

भटक्या विमुक्त जाती-जमाती : राजाभाऊ खेमनार (411) विजयी,सुदर्शन सांगळे (301),आप्पासाहेब दराडे (286), सुरेश देवकर (5),बन्सीलाल कुमावत (2).

महिला राखीव प्रतिनिधी (दोन जागा) : दीप्ती पाटील (726), कविता शिंदे (648) विजयी, अनिता भामरे (398).

खेमनार जॉयंट किलर

एनटी गटातून राजाभाऊ खेमनार यांच्या उमेदवारीला राजेंद्र भोसले, शिवाजी रौंदळ, प्रमोद मुळाणे यांनी विरोध केला होता. त्यानंतर उमेदवारी केलेल्या खेमनार यांना पाडण्यासाठी जंग-जंग पछाडले. मात्र, खेमनार हे तब्बल 117 मतांच्या फरकाने विजयी झाले. त्यामुळे जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या एनटी गटातून खेमनार हे जॉयंट किलर ठरले आहेत.

गुलालाची उधळण

मतमोजणी सुरू असताना निकालाचा कल दिसून येताच समर्थकांकडून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात होत्या. यानंतर विजयी उमेदवारांची घोषणा होताच विजयी उमेदवारांसह समर्थकांनी जल्लोष केला. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करून पेढे भरवून जल्लोष करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या