Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरजिल्ह्यातील 'या' 12 केंद्रावर उद्या होणार करोना लसीकरण

जिल्ह्यातील ‘या’ 12 केंद्रावर उद्या होणार करोना लसीकरण

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

करोना लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यात उद्या (शनिवार) 12 केंद्रावर करोना प्रतिबंध लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

महापालिकेचे नगर शहरात चार, तर जिल्हा रुग्णालयाचे जिल्ह्यात आठ लसीकरण केंद्र असणार आहे. पहिल्या टप्प्यातील या लसीकरणात पुणे येथील सीरमची कोव्हीशिल्ड ही लस आरोग्य कर्मचारी, पोलीस अधिकारी-कर्मचारी, सफाई कामगार आदींन दिली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेला 39 हजार 270 डोस प्राप्त झाले आहेत.

जिल्हा रुग्णालयाचे जिल्ह्यात लसीकरणासाठी आठ केंद्र आहेत. त्यात जिल्हा सामान्य रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी, उपजिल्हा रुग्णालय कर्जत, शेवगाव ग्रामीण रुग्णालय, श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय, राहाता ग्रामीण रुग्णालय, संगमनेर ग्रामीण रुग्णालय, अकोले ग्रामीण रुग्णालय येथील रुग्णालयात लसीकरणाचे नियोजन आहे.

या केंद्रावरील सर्व तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखर्णा यांनी आज याचा आढावा घेतला. जिल्हा रुग्णालयाकडे सुमारे 32 हजार 720 लाभार्थी पहिल्या टप्प्यात आहेत. त्यात पोलीस कर्मचार्यांचा देखील समावेश आहे. जिल्ह्यातील सुमारे 4 हजार 100 पोलीस अधिकारी-कर्मचारी यांना लस दिली जाणार आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने लसीकरणासाठी चार केंद्र निश्‍चित केली आहेत. तोफखाना, भोसले आखडा येथील जिजामाता, नागापूर आणि केडगाव येथील आरोग्य केंद्रावर लस दिली जाणार आहे. महापालिकेला सुमारे 7 हजार 500 डोस प्राप्त झाले आहेत. याद्वारे 3 हजार 750 लाभार्थ्यांना लस टोचली जाणार आहे.

अहमदनगर शहरात खाजगी आणि सरकारी असे दोन्ही मिळून सुमारे 6 हजार 900 आरोग्य कर्मचारी आहेत. त्यातील 6 हजार 870 जणांची नोंदणी झाली आहे. ही लस ऐच्छिक आहे. त्यामुळे कोणालाही बळजबरी करण्याचा अर्थच ऊरत नाही.

प्रत्येक केंद्रावर आज दिवसभरात फक्त शंभर लाभार्थ्यांना लस टोचली जाणार आहे. त्यानंतर आठवड्यातून तीन वेळा लसीकरणाचे आयोजन केले जाईल, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली.

असे होणार लसीकरण

जिल्ह्याला सीरमच्या कोव्हिशील्डचे डोस मिळाले आहेत. लाभार्थ्यांना ही लस दंडावर इंजेक्शनद्वारे दिली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक केंद्रावर प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व चार कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लसीकरण सुरू राहणार आहे. लाभार्थ्याचे लसीकरण झाल्यानंतर त्यांना अर्धा तास वेटिंग रुममध्ये निरीक्षणाखाली ठेवले जाणार आहे. अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली. लाभार्थीला लस घेणे हे ऐच्छिक आहे. लाभार्थी लसीकरण केंद्रावर आल्यानंतर त्याच्या शरीराचे तापमान तपासले जाणार आहे. त्यानंतर त्याची ओळख घेतली जाईल. लस देण्याची माहिती दिली जाईल. त्यानंतर इंजेक्शनद्वारे लस लाभार्थ्याला दिली जाईल. यानंतर लाभार्थ्याची पोर्टलवर नोंद घेतली जाईल. लसीकरण झाल्यानंतर लाभार्थ्याला अर्धा तास पुन्हा वेटिंग रुममध्ये निरीक्षणासाठी ठेवले जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या