Saturday, April 27, 2024
Homeनाशिकजातपडताळणी प्रमाणपत्रांचे महाविद्यालयांमध्ये वितरण; विद्यार्थ्यांची धावपळ टाळण्यासाठी जातपडताळणी समितीचा पुढाकार

जातपडताळणी प्रमाणपत्रांचे महाविद्यालयांमध्ये वितरण; विद्यार्थ्यांची धावपळ टाळण्यासाठी जातपडताळणी समितीचा पुढाकार

नाशिक । प्रतिनिधी

विज्ञान शाखेत १२ वीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना वरिष्ठ महाविद्यालय आणि उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना सोयीचे व्हावे यासाठी नाशिक जातपडताळणी समितीने पुढाकार घेतला असून अर्ज दाखल करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र दहा दिवसांच्या कालावधीत थेट महाविद्यालयात वितरित केले जाणार आहे.

- Advertisement -

एचपीटी-आरवायके विज्ञान महाविद्यालयातून जात माणपत्र वितरण अभियानाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. दहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर वरिष्ठ महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतेवेळी जात पडताळणी प्रमाणपत्राअभावी विद्यार्थी व त्यांच्या पालकांची धावपळ होते. प्रवेश नियंत्रण प्राधिकरणाने शैक्षणिक प्रवेशावेळीच जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केल्यामुळे विद्यार्थी व पालकांची होणारी धावपळ थांबवण्यासाठी जातपडताळणी समितीकडून बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयातच प्रमाणपत्रे वितरित केली जात आहेत.

तत्पूर्वी संबंधित महाविद्यालयात समितीच्या वतीने विशेष मार्गदर्शक मेळावे घेऊन विद्यार्थ्यांना प्रक्रियेची माहिती देण्यात येते. नाशिकच्या एचपीटी , आरवायके विज्ञान महाविद्यालयात सन २०१९-२० या वर्षातील जात पडताळणीसाठी दाखल करण्यात आलेले प्रस्ताव निकाली काढून विद्यार्थ्यांना नुकतेच दाखल्यांचे वाटप करण्यात आले. समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटोळे, सदस्य विजय कोर, उपायुक्त माधव वाघ, महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एम. सूर्यवंशी, प्रा. जाहीद शेख, यावेळी उपस्थित होते.

अर्ज कसा भरावा, अर्जात नेहमी होणाऱ्या चुका, मोबाइल क्रमांक, इ-मेल, वंशावळ, जातीचा दाखला, त्यासाठी लागणारे पुरावे याबद्दल आवश्यक सूचना या मेळाव्याच्या माध्यमातून देऊन विद्यार्थ्यांकडून आलेल्या अर्जाची तत्काळ पडताळणी करून ते निकाली काढण्यात येत आहेत.

-माधव वाघ , उपायुक्त, जातपडताळणी समिती, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या