Saturday, May 11, 2024
Homeनगरटाकळीभान येथील विठ्ठल देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करा

टाकळीभान येथील विठ्ठल देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करा

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

येथील विठ्ठल मंदीर देवस्थानचे विश्वस्त मंडळ देवस्थानच्या विकासात कमी पडल्याने विद्यमान विश्वस्त मंडळ बरखास्त करून कथीत कुळाकडे असलेली देवस्थानची 88 एकर बागायत जमीन काढून घेण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बापुसाहेब शिंदे यांनी गेल्या तीन महिन्यांपूर्वी केली होती. ग्रामपंचायत प्रशासनाने आता या प्रकरणात उडी घेतल्याने कथीत कुळांसह विश्वस्त मंडळाचेही धाबे दणाणले आहेत.

- Advertisement -

येथील विठ्ठल मंदीर देवस्थानला सुमारे 89 एकर इनाम वर्ग 3 ची जमीन आहे. देवस्थानची देखभाल व दिवाबत्तीसाठी ही जमीन देवस्थानला मिळालेली आहे. ही जमीन इनाम वर्ग 3 ची असल्याने या जमिनीला कुळ लागत नाही व विक्री करता येत नाही. मात्र सुमारे 1960 पासून या जमिनी कथीत कुळांच्या ताब्यात असल्याने त्यातील उत्पन्नाचा हिस्सा देवस्थानच्या विकासासाठी होत नसल्याने ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांमध्ये गेल्या 40 वर्षांपासून हा विषय गाजत आहे. सुमारे 1984 सालापासून देवस्थानचा कारभार न्यास नोंदणी केलेले विश्वस्त मंडळ पहात आहे. या विश्वस्त मंडळानेही कथीत कुळांकडील जमिनी काढून घेण्यास पुरेसा प्रयत्न केला नसल्याने विश्वस्त मंडळाच्या राजीनाम्याची मागणी वारंवार होत होती.

गेल्या तीन महिन्यांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब शिंदे यांनी कथीत कुळांकडील जमिनी काढून घेण्यात याव्यात व नव्याने विश्वस्त मंडळ स्थापन करून ही जमीन देवस्थानच्या विकासासाठी विश्वस्त मंडळाच्या ताब्यात देण्यात यावी, अशी मागणी धर्मादाय उपायुक्त अहमदनगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. ग्रामपंचायतीलाही निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार ग्रामपंचायत प्रशासनाने विश्वस्त मंडळाच्या दोन बैठका घेतल्या होत्या. मात्र या बैठकांत सकारात्मक तोडगा निघाला नव्हता. त्यानंतर ग्रामपंचायतीने सदस्यांच्या बैठकित विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा ठराव करून शुक्रवार दि. 9 जुलै रोजी धर्मादाय उपायुक्त सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अहमदनगर येथे अधीक्षक यु. बी. गावडे यांची भेट घेऊन टाकळीभान येथील विठ्ठल मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करणेबाबत निवेदन दिले.

यावर अधीक्षक यु.बी.गावडे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून टाकळीभान येथील विठ्ठल मंदिर देवस्थान बाबत चौकशी करण्याचे कामकाज निरीक्षक डी. एस. आंधळे यांच्याकडे देण्यात आले असून लवकरच याबाबत कार्यवाही सुरू होईल असे आश्वासन त्यांनी दिल्याने लवकरच विश्वस्त मंडळाची चौकशी करून कथीत कुळांकडील जमिनी काढून घेण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रकरणात उडी घेतल्याने कथीत कुळांसह विश्वस्त मंडळाचे धाबे दणाणले आहेत.

यावेळी उपसरपंच कान्होबा खंडागळे, प्राचार्य जयकर मगर, सदस्य मयुर पटारे, भाऊसाहेब पटारे, शिवाजी शिंदे, यशवंत रणनवरे, विलास सपकळ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या