Saturday, April 27, 2024
Homeनाशिकवैद्यकीय अधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई

वैद्यकीय अधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई

नाशिक । प्रतिनिधी Nashik

चिखलओहोळ (ता. मालेगाव) प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार न मिळाल्याने नवजात अर्भक मृत्यूप्रकरणी या आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, प्रभारी वैद्यकीय अधिकारी यांसह दोन आरोग्य सेविकांवर शिस्तभंगाची कारवाई जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केली आहे. यामुळे सेवकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

मालेगाव तालुक्यातील चिखलओहळ गावात शेतमजुरीसाठी आलेल्या सोनाली दिलीप शिंदे (वय 35 रा. परभणी) या प्रसूतीसाठी चिखलओहळ आरोग्य केंद्रात दाखल झाल्या. 6 डिसेंबर रोजी त्यांची प्रसूती सुखरूप पार पडली. बाळाची तब्येतही ठीक होती. दरम्यान, दुपारी बाळाची तब्येत अचानक खालावल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य केंद्रावर डॉक्टर्स, नर्स किंवा आरोग्य सहायक कर्मचारी उपस्थित नव्हते. तब्बल एक तास बालकाला त्रास होत असतांना त्याच्यावर वेळीच उपचार न झाल्याने ते दगावले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या निलंबनाची मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हर्षल नेहते यांनी आरोग्य केंद्रास भेट देवून त्याची पाहणी केली होती. या आरोग्य केंद्रामधील डॉक्टर आणि आरोग्य सहाय्यक हे हजेरी वहीमध्ये स्वाक्षरी करून केंद्रात उपस्थित नसल्याचे उपासात उघड झाले आहे. यावर चौकशी अधिकारी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नेहेते आणि डॉ. युवराज देवरे यांनी याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांना सादर केला होता. त्यानुसार मित्तल यांनी या सहा कर्मचार्‍यांना आपण आरोग्य केंद्रात का उपस्थित नव्हता? अशी नोटीस काढून पाच दिवसात खुलासा करण्यास सांगितले होते.

अर्भकाच्या मृत्यूप्रकरणी आपणास जबाबदार का धरले जाऊ नये? याबाबतही खुलासा करण्याचे आदेश बजाविले होते. त्यानुसार, संबंधितांना खुलासा सादर केला असून, हा खुलासा समाधानकारक नसल्याने यातील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाई अतंर्गत सेवासमाप्तीचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. तसेच त्यांची बदली थेट सुरगाणा तालुक्यातील बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे करण्यात आली आहे.

प्रभारी वैद्यकीय अधिकारी यांची सेवासमाप्ती केली आहे. तर, आरोग्य केंद्रातील दोन आरोग्य सेविकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नेहेते यांनी दिली. याबाबतचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी मित्तल यांनी काढले असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या