Friday, April 26, 2024
Homeनगरदिशादर्शक फलक नसल्याने टाकळीभानचे दुभाजक ठरतात जिवघेण

दिशादर्शक फलक नसल्याने टाकळीभानचे दुभाजक ठरतात जिवघेण

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर-नेवासा राज्य मार्गावरील टाकळीभान येथील वाहतूक नियंत्रित व्हावी, या हेतूने बस स्थानक परीसरात रस्ता दुभाजक टाकण्यात आले आहेत. मात्र दुभाजक असलेला दिशादर्शक फलक लावला नसल्याने वाहन चालकांना रात्रीच्या वेळी दुभाजकाचा अंदाज येत नसल्याने वाहने थेट दुभाजकाला धडकत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व रस्ता दुरुस्तीचे काम करणार्‍या ठेकेदार कंपनीकडे तक्रार देऊनही ते मुजोरी करत वाहन चालकांच्या जिवाशी खेळत आहेत.

- Advertisement -

बाभळेश्वर ते नेवासाफाटा या महत्वाच्या वर्दळीच्या राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरु आहे. या अंतरादरम्यान विविध ठेकेदार कंपन्यांना रुंदीकरणाचे व दुरुस्तीचे काम देण्यात आले आहे. मात्र ठेकेदार कंपन्या राज्य मार्गावरुन प्रवास करणार्‍या प्रवाशांचा किंवा गावहद्दीत व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांचा विचार न करता मुजोरीने हे काम करीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे या ठेकेदार कंपन्यांवर नियंत्रण असतानाही या विभागाकडे तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे आधिकारी व कर्मचारी बघ्याची भुमिका घेत ठेकेदारांना सुचना करीत नाहीत. त्यामुळे ठेकेदार कंपन्या व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यात साटेलोटे असल्याची चर्चा होत असून याबाबत तक्रार करायची कोणाकडे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रस्ता रुंदीकरणाचे व दुरुस्तीचे काम घेतलेल्या एका ठेकेदार कंपनीने राज्यमार्गाचे टाकळीभान हद्दीतील काम गेल्या तीन महिन्यापुर्वीच पूर्ण केले आहे. टाकळीभान बसस्थानक परिसरात नेहमीच वर्दळ असल्याने वाहतूक नियंत्रित व्हावी, यासाठी सुमारे 800 मिटर लांबीचे दुभाजक टाकले आहेत. दुभाजक टाकताना दुभाजकाच्या दोन्ही बाजुला दिशादर्शक फलक (रेडीयम रिफ्लेक्टर) लावण्यास ठेकेदार कंपनीने कसुर केला आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी वाहन चालकांना दुभाजकाचा अंदाज न आल्याने वाहने थेट दुभाजकावर धडकून अपघातात वाहनांचे मोठे नुकसान होत आहे.

आतापर्यंत सुमारे 9 वाहने दुभाजकावर धडकले असून त्यात वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने अद्याप अपघात होऊन जिवित हानी झालेली नाही. याबाबत ठेकेदार कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी सूचना देऊन फलक लावण्याची मागणी केली आहे. मात्र ठेकेदार कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुजोरीमुळे वारंवार दुभाजकावर अपघात होण्याची मालिका सुरुच आहे.

या राज्यमार्गाच्या दुरुस्तीच्या कामात ठेकेदार कंपनीने कसुर केला आहे. राज्यमार्गावर टाकण्यात आलेल्या दुभाजकात वाहतुकीच्या नियमांना कोलदांडा दिला गेला असल्याने दुभाजकावर वाहने आदळुन झालेल्या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी फलक लावण्याची मागणी करण्यात आली असून या विभागाला कुंभकर्णाची झोप लागल्याचे दिसत आहे. एखादा निरपराध जिव दुभाजकाला आदळुन गेल्यावर या विभागाला जाग येणार काय? सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येण्यासाठी लवकरच दुभाजकावर बसून रास्तारोको आंदोलन हाती घेतले जाणार आहे.

– नवाज शेख, जिल्हा कार्याध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष.

- Advertisment -

ताज्या बातम्या