‘त्या’ देवदूतांचा दिंडोरी पोलिसांकडून सत्कार

jalgaon-digital
3 Min Read

दिंडोरी | संदीप गुंजाळ

स्वतः घ्या मुलीलाच संपवण्याचा प्रयत्न एका गुराखीमुळे फसल्याची घटना दिंडोरी तालुक्यातील देहेरेवाडी (Deherewadi Tal Dindori) येथे गेल्या आठवड्यात घडली होती. गुराखी दाम्पत्याने प्रसंगावधान राखत पोलीस पाटील यांच्या सहकार्याने मुलीला जीवदान दिले. संशयित वडील बारा तासांत पकडण्यात पोलिसांना यशही आले होते….

दिंडोरी- देहरेवाडी प्रकरण : फिर्यादी वडीलच निघाला आरोपी

सामाजिक बांधिलकी जपत मुलीला जीवदान दिले असले तरी प्रतिक्षासाठी देवदूत ठरणार्‍यांचा दिंडोरी पोलिस ठाण्याच्या वतीने सत्कार व सन्मान करून एक आदर्श उपक्रम पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी देहरेवाडी जंगलात बापानेच मुलीला मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्या गुराखीच्या प्रसंगावधानामुळे व पोलीस व इतर व्यक्तींच्या सहकार्याने पीडित मुलीला जीवदान मिळाले.

दिंडोरी नगरपंचायतसाठी ८० टक्के मतदान

या अनुषंगाने त्या गुराखी दाम्पत्याचा सत्कार दिंडोरी पोलीस ठाण्याच्या (Dindori Police Station) वतीने आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी गुराखी नारायण दौलत गांगुर्डे व हिराबाई दौलत गांगुर्डे तसेच साहेबराव विष्णू साळवे, मुलीला रूग्णालयात पोहोचवणारे वाहन चालक योगेश लभडे यांचा सत्कार करण्यात आला.

या दाम्पत्याचा सत्कार दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे यांच्या हस्ते करण्यात आला.

एखाद्या गुन्ह्यात पोलिसांना सहकार्य केले तर आपणही त्यांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकून पोलिस ठाण्याच्या चकरा मारत रहावू अशी भीती जनतेकडून व्यक्त होत असते. त्यामुळे पोलिस ठाण्याचा काही प्रकार असेल तर लांबच बरे असे म्हणून पोलीसांना मदत करण्याचे धाडस सहसा कोणी करत नाही.

परंतु देहरेवाडीतील एक सामान्य कुटुंबातील गुराखी दाम्पत्याने मोठे धाडस करून एका मुलीला जीवदान दिले तसेच स्थानिक पोलीस पाटील यांनी देखील आवश्यक ती खबरदारी घेत तात्काळ पावलं उचलली हे नक्कीच उल्लेखनीय आहे.

त्यामुळे या गांगुर्डे परिवार व पोलीस पाटलांचे दिंडोरी तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे , पवार, पोलीस हवालदार दिलीप पगार, प्रमोद मुंढे, संजय जाधव , युवराज खांडवी, राजेंद्र लहारे , बाळासाहेब पानसरे, धनंजय शिलावटे, संदिप कडाळे यांनी या दाम्पत्याचे कौतुक केले आहे.

सत्कारप्रसंगी देहरेवाडी गावचे बंडू गांगुर्डे, दौलत गांगुर्डे, यमुनाबाई गांगोडे, अनिता जाधव, शरद जाधव, नंदा बेंडकुळे, भारत बेंडकुळे, सरला जाधव, रामनाथ उघडे, ओमकार लभडे आदीसह नागरिक उपस्थित होते. यावेळी आलेल्या महिलांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.

कोणत्याही गुन्ह्यात जनतेच्या सहकार्याशिवाय आरोपींपर्यंत पोहचणे अवघडच असते. त्यामुळे जनतेचे सहकार्य पोलिसांना अपेक्षित आहे. एका सर्वसामान्य गुराख्याच्या प्रसंगावधानामुळे आज एका मुलीला जीवदान तर मिळालेच परंतु सदर आरोपीलाही आम्ही जेरबंद केले. हा एक आदर्श इतरांनीही घ्यावा व पोलिसांकडून एक शाबासकीची थाप म्हणून एक प्रेरणा समाजाला मिळावी हाच एक उद्देश आम्ही या उपक्रमामागे ठेवला असून नक्कीच यात यश मिळून इतरही लोकं याची प्रेरणा घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.

– प्रमोद वाघ, पोलीस निरीक्षक, दिंडोरी

माझ्या प्रयत्नामुळे एका मुलीला जीवदान मिळाले याचा मला खुप आनंद वाटतो. पोलिसांशी बोलायला भीती वाटत होती पण आज त्यांच्याकडूनच माझा व बायकोचा सत्कार करण्यात आला हे आयुष्यात कधीच विसरणार नाही.

– नारायण गांगुर्डे, गुराखी, देहरेवाडी

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *