Wednesday, April 24, 2024
Homeनगरडिग्रस फाटा येथे दोन ब्रास वाळूसह टेम्पो पकडला

डिग्रस फाटा येथे दोन ब्रास वाळूसह टेम्पो पकडला

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखा पथकाने रात्रीच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील डिग्रस फाटा येथे विनापरवाना बेकायदा दोन ब्रास वाळूसह टेम्पो पकडून कारवाई केली. 5 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र यातील आरोपी हा अंधाराचा फायदा घेऊन पसार होण्यात यशस्वी झाला.

- Advertisement -

स्थानिक गुन्हे शाखा पथकातील पोलीस नाईक शिवाजी अशोक ढाकणे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, 1 मे रोजी रात्री 11.30 वाजे दरम्यान पोलीस नाईक शिवाजी ढाकणे, सचिन दत्तात्रय आडबल, सागर अशोक ससाणे, आकाश राजेंद्र काळे आदी पथक वरिष्ठांच्या आदेशाने खासगी वाहनामधून राहुरी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालीत होते. त्यावेळी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक गणेश सानप यांना बरोबर घेऊन राहुरी तालुक्यातील डिग्रसफाटा येथे सापळा लावला.

त्यावेळी वाळूने भरलेला एक टेम्पो डिग्रसकडून राहुरीच्या दिशेने येताना दिसला. तेव्हा पथकाने सदर टेम्पो चालकास थांबण्याचा इशारा केला. त्यावेळी चालकाने टेम्पो रोडच्या कडेला थांबवून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. पोलीस पथकाने त्याचा पाठलाग केला असता तो मिळून आला नाही. सदर अज्ञात टेम्पो चालक मालकाने शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे शासकीय वाळू चोरून वाहतूक करताना मिळून आला.

पोलीस पथकाने कारवाई करून 5 लाख रुपये किंमतीचा टेम्पो व 20 हजार रुपये किंमतीची दोन ब्रास वाळू असा एकूण 5 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस नाईक शिवाजी ढाकणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. 451/2023 भादंवि कलम 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या