Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकशिवनदीचा पूल असून खोळंबा

शिवनदीचा पूल असून खोळंबा

Narrow Bridge on Shivriver

सिन्नर। अमोल निरगुडे sinnar

- Advertisement -

शहरातील पांडवनगरी ( Pandavnagari ) परिसरातील लोणारे मळा व पाचोरे मळ्यातील शेतकर्‍यांना मळ्यात ये-जा करण्यात अडचणी येत आहेत. शिवनदीचे ( Shiv River )पात्र ओलांडूनच या मळ्यात जाता येत असल्याने याठिकाणी काही वर्षांपूर्वी छोट्या पुलाची ( Bridge )निर्मिती करण्यात आली. मात्र, काळाच्या ओघात हा पुल छोटा पडत ( Narrow Bridge )असल्याने या दोन्ही मळ्यातील शेतकर्‍यांना आपली वाहने या पुलावरुन नेताच येत नाहीत. त्यामुळे हा पूल असून नसल्यासारखा झाला आहे.

15 वर्षांपूर्वी मळ्यातील शेतकर्‍यांनी मुसळगाव गटाचे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य दिलीप शिंदे यांच्याकडे येथील पुलासाठी मागणी केली होती. शिंदे यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे पाठपुरावा करुन या पुलासाठी निधी मंजूर केला. मात्र, प्रत्यक्षात काम होताना अगदी कमी रुंदीचा पूल बनवण्यात आल्याने येथील शेतकर्‍यांच्या अडचणीत वाढच होत गेली.

बसस्थानकावरुन वरंदळ मळा, पांडवनगरी व तेथून दक्षिणेकडे काही अंतर गेल्यानंतर शिवनदीचे पात्र लागते. या पात्रातच बंधारा बांधण्यात आल्याने तेथे बाराही महिने पाणी साचलेले असते. मळ्याच्या दक्षिण भागाकडून घोटी महामार्गाला निघण्यासाठी निट रस्ता नसल्याने येथील शेतकर्‍यांना आपली मोठी वाहने ये-जा करण्यासाठी अडचण होते आहे. मळ्यातील शेतकर्‍यांनी मिळून प्रत्येकाची थोडी-थोडी जागा देत स्व:खर्चाने कच्चा वहिवाटीचा रस्ता बनवला आहे. मात्र, पावसाळ्यात या रस्त्यावर चिखलाचे प्रमाण वाढते.

या चिखलात वाहने फसण्याचे प्रकार पावसाळ्यात घडत असतात. त्यामूळे वाहन चालकांना कसरत करत वाहने घोटी महामार्गावर आणावी लागतात. तर महामार्गाला लागून असलेल्या पाटातून वाहनांना वळण घेण्यास मोठी अडचण निर्माण होते. अनेकदा या ठिकाणी शेतकर्‍यांचे ट्रॅक्टर पलटी झाल्याच्या घटनाही झाल्या आहेत. सद्य परिस्थितीत या मळ्यात 25 ते 30 कुटुंब वास्तव्यास आहेत.

येथील कुटुंबांकडे मिळून 10 ते 12 ट्रॅक्टर, 7 ते 8 चारचाकी, 4 ते 5 पिकअप व 4 रिक्षा आहेत. मात्र, या वाहनांपैकी एकही वाहन या पुलावरुन नेऊ शकत नसल्याने शेतकर्‍यांना आपली ही वाहने विरुध्द दिशेने लांबच्या रस्त्याने शहरात आणावी लागतात. येथील शेतीला बर्‍यापैकी पाणी असल्याने बाराही महीने शेतमाल निघत असतो. या शेतमालाची वाहतूक करण्यासाठी पूल उपयोगातच येत नसल्याने शेतकर्‍यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. येणार्‍या काळात या मळ्यातील शेतकर्‍यांचा विचार करुन येथे मोठ्या पुलाची निर्मिती करण्याची मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

अंत्ययात्रेस कसरत

सदर मळ्यात एखाद्याचा मृत्यू झाल्यास मृतदेह स्मशानभूमीवर नेण्यासाठीही या पुलावरुन मोठी कसरत करत उत्तरेच्या बाजूला आणावे लागते. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या पुढाकारातून मृतदेह नेण्यासाठी तयार केलेला वैकुंठ रथ नदीच्या अलीकडेच थांबून ठेवावा लागतो. नातेवाईंकाना मृतदेह घरातून उचलून नदी ओलांडून वैकुंठ रथापर्यंत कसेबसे यावे लागते.

रुग्णांची गैरसोय

मळ्यातील एखाद्या व्यक्तीला अचानक दवाखान्यात नेण्याची वेळ आल्यावर त्याला दुचाकीवरुन पूल पार करुन रुग्णालयात नेण्याची वेळ येते. दुचाकीवरुन रुग्णांना नेल्यामुळे त्यांच्या व्याधीतही वाढ होते. अशात मोठी वाहने पुलावरुन मळ्यात जात नसल्याने सर्वांची वाहने पांडवनगरी परिसरातील मोकळ्या जागेत लावून ठेवण्याची वेळ येत आहे. पुलाची रुंदी वाढवून परिसरातील रहिवाशांचे जगणे सुखकर करा एवढीच अपेक्षा.

गोरख पाचोरे, नागरिक

- Advertisment -

ताज्या बातम्या