Thursday, April 25, 2024
Homeनगरआईच्या अस्थींचे विसर्जन न करता केली वृक्ष लागवड

आईच्या अस्थींचे विसर्जन न करता केली वृक्ष लागवड

सुपा |वार्ताहर|Supa

सध्या करोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. रुग्णांवर उपचार करताना ऑक्सिजनचा तुटवडा असून त्यामुळे निसर्गातून फुकट मिळणार्‍या ऑक्सिजनचे महत्त्व अनेकांना लक्षात आले आहे. यामुळेच पारनेर तालुक्यातील अस्तगाव येथील लक्ष्मीबाई दिनकर आमले (वय 103) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूपश्चात आपल्या आईची स्मृती कायमस्वरूपी जिवंत राहाव्यात, म्हणून कुटुंबातील मुलांनी आईच्या अस्थी व राख पाण्यात विसर्जन न करता शेतात खड्डा खोदून त्यात अस्थी विसर्जन करत वृक्ष लागवड केली.

- Advertisement -

आईच्या मृत्यूनंतर तिच्या आठवण सदैव अबाधित राहावी, त्यातून गावासमोर एक आदर्श निर्माण व्हावा आणि करोना काळामध्ये ऑक्सिजनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण करावी लागत असून दुसरीकडे झाडांमधून मोठ्या प्रमाणात मोफत ऑक्सिजन मिळत आहे. त्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व्हावे, या ध्येयातून या कुटुंबाने आईच्या अस्थींचे विसर्जन न करता त्यात वृक्ष लागवड केली. लक्ष्मीबाई आमले यांचे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. निधनानंतर प्रथेप्रमाणे अस्थींचे विसर्जन हे वाहत्या पाण्यात नदीत केले जाते.

असे असले तरी त्यांच्या कुटुंबियांनी आईच्या अस्थींचे विसर्जन न करता शेतात खड्डा खणून अस्थी ठेवून वृक्ष लागवड केली आहे. त्यामुळे वृक्षरूपाने आईच्या स्मृती जिवंत ठेवण्याचा एक आदर्श आमले कुटुंबाने समाजापुढे ठेवला आहे. दिवंगत आमले यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा एकत्रित परिवार आहे. आमले आजीच्या निधनानंतर त्याच्या दोन मुलांनी वृक्ष लागवडीचा व त्याला आपल्या आईच्या आठवणी जोडण्याच्या उपक्रमाचे परिसरातून स्वागत होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या