Friday, April 26, 2024
Homeनगरडिझेल प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक

डिझेल प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

डिझेल छापा प्रकरणातील प्रत्येक बारकावे तपासले जात आहे. यासाठी पोलिसांचे स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत.

- Advertisement -

पोलीस या प्रकरणात मुळापर्यंत जाणार आहे. आरोपींची नावे निष्पन्न झाली असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे. लवकरात लवकर आरोपी जेरबंद होतील, असा विश्‍वास जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केला.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक पाटील बोलत होते. बाहेरच्या जिल्ह्यातून नगरमध्ये येत असलेल्या डिझेलचे वितरण जिल्ह्यातील इतर ठिकाणी केले जाते. या प्रकरणात मोठ्या टोळ्या सहभागी असून त्या लवकरच जेरबंद करण्यात येतील.

यावेळी तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या कथित क्लिपबाबत विचारले असता पाटील म्हणाले, क्लिप प्रकरणात यापूर्वीच विशेष पोलीस महासंचालकांकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. क्लिपमध्ये इतर संबंधितांची चौकशी पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. मी स्वतः याप्रकरणी चौकशी करत असून लवकरच या प्रकरणातील सत्य उजेडात येणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

अनेकदा नागरिक गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात येतात. मात्र, गुन्हे दाखल कऱण्यात टाळाटाळ केली जाते, असे प्रकार होऊ नये यासाठी सर्व प्रकारचे गुन्हे दाखल करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील काही पोलीस कर्मचारी हे अवैध व्यवसायाशी संबंधित असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यानुसार अशाप्रकारे व्यवसायाशी संबंधित असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

यापूर्वी पोलीस ठाण्यांच्या अधिकार्‍यांना त्यांच्या कर्मचार्‍यांची माहिती मागवण्यात आली होती. मात्र, याबाबत अहवाल प्राप्त अद्याप प्राप्त झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गुन्ह्याचा तपास करताना काही ठराविक कर्मचार्‍यांकडे तपास न देता सर्व कर्मचार्‍यांना रोटेशननुसार गुन्ह्यांच्या तपासाची संधी देण्यात येणार असल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

डिझेल प्रकरणातील आरोपींची नावे निष्पन्न

डिझेलप्रकरणात तीन आरोपींच्यापर्यंत पोलिस लवकरच पोहोचणार आहेत. या प्रकरणातील आरोपींची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणात कोणाला अभय देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले.

एलसीबीला अनुभवी निरीक्षक

नुकत्याच झालेल्या बदल्यांमध्ये जिल्ह्यात चार पोलीस निरीक्षक अतिरिक्त ठरले आहेत. याबाबत वरिष्ठांना अहवाल पाठवण्यात आला आहे. आता त्यांच्याकडून स्वतंत्र आदेश निर्गमित होऊ शकतात. जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा व शहर वाहतूक शाखेला लवकरच अनुभवी अशा पोलीस निरीक्षकाची नेमणूक केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या