Wednesday, April 24, 2024
Homeनगरडिझेल भेसळ : रासायनिक प्रयोगशाळेच्या अहवालाकडे लक्ष

डिझेल भेसळ : रासायनिक प्रयोगशाळेच्या अहवालाकडे लक्ष

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पोलिसांनी पकडलेले डिझेल भेसळीचे आहे की कसे यासाठी ते तपासणीला रासायनिक प्रयोगशाळेत पाठविले आहे.

- Advertisement -

त्याचा अहवाल आल्यानंतरच भेसळीच्या तपासाला गती मिळेल अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान अटकेतील बेळगेने गुळणी धरल्याने तपासालाही गती मिळत नसल्याचे सांगण्यात आले.

स्टेट बँक चौक परिसरात पोलिसांच्या विशेष पथकाने काळ्या डिझेलची हेराफेरी उघडकीस आणली. या प्रकरणात अनेक मोठी नावे समोर येत असतानाच हा छापाच संशयाच्या भोवर्‍यात अडकला. एकीकडे छापेमारीची चौकशी सुरू असून दुसरीकडे भेसळीच्या रॅकेटचा शोध सुरू आहे.

छापेमारीत जप्त केलेले दोन हजार लिटर डिझेल भेसळीचे आहे की नाही याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी त्या डिझेलचे नमुने तपासणीसाठी नाशिकच्या रासायनिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्या प्रयोगशाळेचा रिपोर्ट आल्यानंतरच तपासाला गती मिळेल असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

दरम्यान या प्रकरणात अटक केलेल्या गौतम बेळगे हा पोलिसांना काहीच माहिती देत नाही. टँकरमध्ये डिझेल कोठे भरले, कोठून पुरवठा झाला. कोणी दिले अशा प्रश्नांच्या उत्तरावर तो माहिती नाही असे उत्तर देत असल्याने खरे सूत्रधार नामानिराळे राहिले आहेत. त्यांना शोधून गजाआड करण्यात पोलीस यशस्वी होणार का? याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे.

‘ते’ पोलीस पथक बरखास्त

अवैध धंद्यावर छापेमारीसाठी एएसपी दत्ताराम राठोड यांनी नियुक्त केलेले पथक काल बुधवारी रात्रीच हेडक्वॉर्टरला जमा करण्यात आले आहे. राठोड यांची बदली झाल्याने हे पथकच बरखास्त करण्यात आले आहे. याशिवाय ‘त्या’ डिझेलचे नमुने तपासणीसाठी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीकडेही तपासणीला पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

प्रयोगशाळेतील रिपोर्टनंतर तपासाची दिशा ठरेल. तोपर्यंत त्यावर भाष्य करणे योग्य नाही. भेसळ आढळलीच तर मुळासकट जावून तिचा बिमोड केला जाईल. कोणत्याही दबावाला बळी न पडता कायदेशीर कारवाई केली जाईल.

– मनोज पाटील, पोलीस अधीक्षक.

- Advertisment -

ताज्या बातम्या