Thursday, April 25, 2024
Homeधुळेपुलावरुन घसरुन तरुणाचा मृत्यू

पुलावरुन घसरुन तरुणाचा मृत्यू

सोनगीर – Songir – वार्ताहर :

शिंदखेडा व अमळनेर तालुक्याला जोडणारा वालखेडा ता.शिंदखेडा येथील पांझरा नदीवरील धोकेदायक पुल मोटारसायकली वरून ओलांडताना युवक वाहून गेला.ही दुर्दैवी घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.

- Advertisement -

दीपक नाना पारधी (वय 25, रा. बुरझड ता. धुळे) असे मयताचे नाव आहे. पुलावरून पांझरेचे पाणी जात असल्याने त्याखाली तुटलेला पुल लक्षात न आल्याने मोटारसायकलचे चाक खड्ड्यात गेले.

त्यामुळे तोल जाऊन दीपक मोटारसायकलसह पुरात वाहून गेला. वालखेडा येथील युवकांनी त्याला व मोटारसायकलला बाहेर काढले परंतु तोपर्यंत दीपक मयत झाला होता.

दीपक पारधी हा देवळी (ता. अमळनेर) येथे वीज वितरण कंपनीत टेंपररी बेसिसवर बाह्यस्त्रोत तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होता. बुरझड ते अमळनेर दरम्यान दररोज मोटारसायकलने ( क्र.एमएच 15, सीयू, 1579) ये-जा दीपक हा करीत होता.

पांझरेचे पाणी पुलावरून जात असल्याने तो वालखेडा-बेटावद असा फिरून घरी जात होता. आज सकाळी साडेआठच्या सुमारास घरून जेवणाचा डबा घेऊन तो ड्युटीवर जात असतांना वालखेडा जवळील पांझरा पुलावर कमी पाणी वाहत असल्याचे पाहून त्याने बेटावदमार्गे फिरून न जाता पुलावरून मोटारसायकल नेण्याचा प्रयत्न त्याने केला.

मात्र पुलावरून पाणी जात असल्याने पुलाचा तुटलेला भाग न दिसल्याने मोटारसायकल खड्ड्यात जाऊन तो पुलाखाली पडला व मोटारसायकलसह वाहत जाऊन पुलापासून तीनशे मीटर अंतरावर अडकला.

वालखेड्यातील युवकांनी त्याला बाहेर काढले. घटना मारवड पोलीस ठाणे अंतर्गत असल्याने त्याला अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याचे शवविच्छेदन करण्यात आले.

दीपकची आई भारतीबाई व वडील नाना शेंपा पारधी शेतकरी असून वणी गडावर पुजेचे साहित्य विक्रीचे दुकान लावतात. कोरोनामुळे सध्या दुकान बंद आहे. लहान भाऊ भूषण व बहीण चंद्रकला शिक्षण घेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या