Thursday, April 25, 2024
Homeधुळेधुळे-नंदुरबार मतदार संघात 99.31 टक्के मतदान

धुळे-नंदुरबार मतदार संघात 99.31 टक्के मतदान

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी 8 ते सायंकाळी 5 या कालावधीत 99.31 टक्के मतदान झाले, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक प्राधिकारी संस्था मतदार संघाच्या निवडणुकीसाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील तहसील कार्यालयात मतदान केंद्र कार्यान्वित करण्यात आले होते.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रांवर वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात आले होते. या मतदान केंद्रांवर आज सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरवात झाली.

धुळे ग्रामीण तहसील कार्यालयातील मतदान केंद्राला निवडणूक निरीक्षक सोनिया सेठी, जिल्हाधिकारी श्री. यादव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे) यांनी भेट देवून पाहणी केली.

पदाधिकार्‍यांमध्ये उत्साह

विधान परिषदेच्या या पोट निवडणूकीत भाजपतर्फे अमरिशभाई पटेल तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महाआघाडीच्या वतीने अभिजीत पाटील यांनी उमेदवारी केली.

सुरवातीपासून भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता तो आज मतदान केंद्रांबाहेरही जाणवला.

धुळ्यात खा.डॉ. सुभाष भामरे, भाजप जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर चंद्रकांत सोनार यांच्यासह पदाधिकार्‍यांनी एकत्रित मतदान केंद्राबाहेर उपस्थिती दिली तर मतदारांनी सकाळच्या पहिल्या टप्प्यातच मतदानासाठी प्रतिसाद दिला.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांनीही धुळ्यातील मतदान केंद्राबाहेर उपस्थिती दिली.

शिरपूरात नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्यासह नगरसेवक, मतदारांनी आपला हक्क बजवला.

दोंडाईचात माजी मंत्री आ. जयकुमार रावल, नगराध्यक्ष नयनकुवर रावल यांच्या पुढाकाराने चांगले मतदान झाले. त्यामुळे या निवडणूकीत विशेषत: भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आढळून आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या