Saturday, April 27, 2024
Homeधुळेवेतनासाठी एसटी कामगारांचे आत्मक्लेश आंदोलन

वेतनासाठी एसटी कामगारांचे आत्मक्लेश आंदोलन

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

वेतनासंबंधी शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करुन देखील शासनाने अद्यापपर्यंत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

- Advertisement -

वेतन त्वरीत मिळावे यासाठी आज एसटी महामंडळाच्या मुख्यालय ठिकाणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.

आत्मक्लेश आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष दीपक पांडव, विभागीय सचिव संतोष वाडीले, विभागीय खजिनदार डी.आर. राजपूत, पोपटराव चौधरी, आर.के. महाजन, दीपक जगताप, के.आर. बडगुजर आदींसह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते.

संघटनेने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीत एसटी महामंडळाने परराज्यातील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणून त्यांच्या घरापर्यंत सोडले. परप्रांतीय मजूरांना त्यांच्या गावापर्यंत पोहचविले.

गणपती उत्सवामध्ये सुरक्षित काहींना गावी आणले. मालवाहतूक सेवा करीत असतांना चालक-वाहक यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून जीवावर उदार होवून कामगिरी बजावली आहे. तसेच लॉकडाऊन नंतरच्या ऑनलॉकमध्ये सुध्दा सप्टेंबर महिन्यापासून एसटी सेवा सुरु झाली. त्यामुळे कामगार आणि कर्मचारी त्यांची सेवा बजावत आहे. पण त्यांना वेतन मिळत नाही.

वेतन संदर्भात शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करुन देखील शासनाकडून ठोस निर्णय अद्यापर्यंत घेण्यात आलेला नाही. एसटी महामंडळाला आतापर्यंत कोेट्यावधींचा महसूल कोरोना काळात मिळाला आहे. असे असतांना मात्र कामगारांचा प्रश्न प्रलंबित आहे. कोरोना महामारीत कोणत्याही कामगाराने वेतनाचा प्रश्न उपस्थित केला नाही. मात्र आता कामगाराला जीवन जगणे अशक्य झाले आहे. त्यामुळे त्वरीत वेतन मिळावे असे पत्रकात म्हटले आहे.

लालपरीला कोरोनाचा सर्वाधिक फटका

राज्याची जीवनवाहिनी अर्थात लालपरीला कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका बसला आहे. सुमारे सहा महिन्यापासून एसटीचा चक्काजाम झाल्यामुळे एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक झाली आहे.

त्याचा परिणाम कामगारांच्या वेतनावर झाला आहे. सुमारे दोन-दोन महिने वेतन होत नसल्यामुळे कामगारांची व त्यांच्या कुटुंबियांची उपासमार होत आहे. जीवन कसे जगावे? असा प्रश्न कामगारांपुढे उभा राहिला आहे. यामुळे आज एसटी महामंडळाच्या मुख्यालयासमोर एक दिवसाचे आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या