Wednesday, April 24, 2024
Homeधुळेवेध लाडक्या गणरायांचे

वेध लाडक्या गणरायांचे

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

लाडक्या गणरायाचे सार्‍यांनाच वेध लागले असून अवघ्या दोन दिवसांवर विघ्नहर्त्याच्या स्थापनेचा महोत्सव येवून ठेपला आहे. यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. शासनाने काही निर्बंध घातले आहेत. असे असतांना गणेश भक्तांचा उत्साह मात्र तेवढाच दांडगा आहे. त्यांच्यासाठी बाजारात आकर्षक गणेश मूर्तींच्या विक्रीची दुकाने थाटली आहेत.

- Advertisement -

कोरोनामुळे शारीरिक अंतर राखणे अत्यंत गरजेचे असल्यामुळे शासनाने यावेळी सर्वच सणउत्सव साध्या पध्दतीने साजरी करण्याचे सांगितले आहे. अर्थातच सार्वजनिक गणेशोत्सवावर देखील कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे पाच फुटांपेक्षा मोठी गणेश मूर्ती विराजीत करु नये असे निर्देश शासनाने दिले आहेत.

मात्र घराघरात विराजीत होणार्‍या गणरायांच्या अत्यंत रेखीव सुरेख मूर्ती बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. लॉकडाऊनचे नियम पाळत विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. यात पेण, पनवेल, नंदुरबार, अमरावती यासह धुळ्यातील मूर्तीकारांनी बनविलेल्या गणेश मूर्तींचा समावेश आहे. पाच इंचापासून ते पाच फूटांपर्यंतच्या मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कोरोनाचे संकट, शासनाने केलेले आवाहन आणि पर्यावरण यांचा विचार करता यंदा शाडू मातीच्या मूर्तींना अधिकची मागणी आहे.

लाकडाऊनमुळे मूर्तींचे दर वाढलेले असतील, असा अंदाज मात्र फोल ठरला असून विक्रेत्यांनी कुठलेही वाढीव दर न लावता माफक दरात मूर्ती उपलब्ध केल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या