Thursday, April 25, 2024
Homeधुळेगुटख्याचे उत्पादन करणार्‍यांवरही कारवाई

गुटख्याचे उत्पादन करणार्‍यांवरही कारवाई

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

तरूणाई गुटख्याच्या आहारी जात आहे. त्यामुळे आता गुटखा वाहतूक करणार्‍यावर तर कारवाई होईल. मात्र त्या गुटख्याची मॅन्युफॅक्चरींग करणार्‍यांवरही गुन्हे दाखल केला जाईल.

- Advertisement -

याबरोबर जिल्ह्यात गंभीर गुन्हे व सामुहिकरीत्य गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांचीही माहिती संकलीत करण्यासह प्रस्ताव तयार आदेश दिले असून त्याच्यावर तडीपारसह मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी पत्रपरिषदेत दिली.

जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात डॉ. दिघावकर यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अपर पोलिस अधिक्षक डॉ. राजु भुजबळ हे उपस्थित होते. डॉ. दिघावकर म्हणाले, जिल्ह्यात सण, उत्सव साध्यापध्दतीने साजरे झाले.

परंतू आता खरा कसोटीचा काळ आहे. कारण नागरिक बिनधास्त फिरू लागले आहेत. नागरिकांनी उलट आता अधिक काळजी घेतली पाहीजे. हॉस्पिटलचा खर्च व कुटुंबियांचा त्रास वाचविण्यासाठी घराबाहेर पडतांना मास्क वापरावा. सोशल डिस्टंन्स ठेवावे. विनाकारण फिरू नये. शासनाच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

धुळे शहरासह साक्री व शिरपूरातील घरफोडीच्या गुन्ह्यांवर विशेष लक्ष राहणार आहे. तसेच सामुहिक रित्या गुन्हे करणार्‍यांचे मोक्कातंर्गत कारवाईसाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना दिल्या आहेत. जिल्ह्यात घातक शस्त्र बाळगणार्‍यांवर व गेल्या पाव वर्षात ज्यांनी घातक शस्त्राचा वापर करून गुन्हे केले आहेत, अशा गुन्हेगारांची माहिती संकलीत करून त्यांना तडीपार करण्याचे आदेश देखील दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना काळात अनेक पोलिस बांधवांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे त्यांच्या आरोग्यासाठी पोलिस कर्मचार्‍यांना व्हिटॅमिन गोळ्याचे किट दिले जाणार आहे. यासाठी प्रथम दहा हजार हेल्थ किटची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनही मास्क वापरावे, असे आवाहनही पोलिस महानिरीक्षक दिघावकर यांनी केले.

पोलिस महानिरीक्षक दिघावकर यांनी पुढे सांगितले की, मी स्वतः शेतकरी कुटुंबातून आलो आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या समस्यांची जाणीव आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची व बेरोजगार युवकांची फसवणूक करणार्‍यांची गय केली जाणार नाही हे प्रकार गांभीर्याने घेऊन प्राधान्याने गुन्हे दाखल करावेत, असे आदेशही त्यांनी अधिकार्‍यांना दिले आहेत.

तसेच रस्ते आणि महामार्गांवरील गुन्हेगारी, अवैध दारू व गुटख्यांची वाहतूक करणार्‍यांवर विशेष लक्ष राहिल.चेकपोस्ट कडक तपासणी करावी. तसेच गुटख्याची वाहतूक करणार्‍यांसह त्यांची मॅन्युफॅक्चरींग करणार्‍यांवरही गुन्हे दाखल केले जातील. त्यांच्यावर कलम 328 लावावा, अशास सुचनाही दिल्या असल्याचे दिघावकर यांनी सांगितले.

गुन्हेगार दत्तक योजना राबविणार

गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी आणि सराईत गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गुन्हेगार दत्तक योजना प्रभावीपणे राबविणार असल्याचेही दिघावकर यांनी सांगितले.

त्यात प्रत्येक पोलिसाकडे एकेका गुन्हेगाराची जबाबदारी सोपविण्यात येईल. हे कर्मचारी गुन्हेगारांवर लक्ष ठेवतील.

त्यांना जिवनप्रवाहात आणण्यासाठी मदत करतील. जे गुन्हेगार गुन्हे करत असतील तर त्यांना पंधरा दिवसात पोलिस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगितले जाईल. गुन्हेगारी रोखण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल, असा विश्वास दिघावकर यांनी व्यक्त केला आहे.

नागरिकांसाठी दिला मोबाइल क्रमांक

सामन्यातील सामान्य व्यक्ती त्याची कैफियत मांडण्यासाठी माझ्याकडे येऊ शकते. मी सकाळी साडेनऊ ते रात्री साडेआठ या वेळेत भेटु शकेल. कोणतीही व्यक्ती पूर्व परवानगीशिवाय मला येऊन भेटू शकते, असेही दिघावकर यांनी सांगितले.

कोणाची काही तक्रार, सुचना असल्यास या साठी त्यांनी त्यांचा 9773149999 हा मोबाईल क्रमांकही दिला आहे. मी प्रत्येकाचा फोन स्वीकारतो. त्यामुळे माझा मोबाईल क्रमांक प्रत्येक सामान्य माणसापर्यंत पोहोचला तरी माझी हरकत नसल्याचे दिघावकर यांनी खुलेपणाने सांगितले. तक्रार रास्त असेल, तर तक्रारदाराला निश्चितपणे न्याय मिळेल, असेही डॉ. प्रताप दिघावकर यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या