Friday, April 26, 2024
Homeनगरधानोरे ग्रामसेवकाच्या दप्तरदिरंगाईने ग्रामस्थ हैराण

धानोरे ग्रामसेवकाच्या दप्तरदिरंगाईने ग्रामस्थ हैराण

सात्रळ |वार्ताहर| Satral

राहुरी तालुक्यातील अतिशय महत्त्वाची समजली जाणार्‍या धानोरे ग्रामपंचायतीत चक्क ग्रामसेवकच अधूनमधून हजर होत असल्याने ग्रामस्थांची अनेक कामे खोळंबली आहेत. ज्यादिवशी ग्रामस्थांची व त्या ग्रामसेवकाची भेट होते, त्यावेळी संबंधित अधिकार्‍याकडून ग्रामस्थ व महिलांचाही पाणउतारा केला जातो. ग्रामस्थांना वैयक्तिक कामासाठी हेलपाटे मारावे लागत असल्याने ग्रामपंचायतीत अन्य कार्यक्षम अधिकार्‍याची नेमणूक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. विद्यमान ग्रामसेवक दप्तरदिरंगाई करीत असल्याने या अधिकार्‍याची उचलबांगडी करण्याची मागणी होत आहे.

- Advertisement -

येथील तत्कालीन ग्रामसेवक लांबे यांची सहा महिन्यापूर्वी बदली झाली. त्यानंतर प्रभारी म्हणून गाढे यांच्याकडे पद्भार देण्यात आला. गाढे यांच्याकडे दोन गावे असल्यामुळे ते धानोरेला क्वचितच येतात. तसेच येथील कामेही ठप्प झाली आहेत. ग्रामस्थांना रहिवासी दाखला तसेच इतर कामासाठी हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. येथील ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी, राहुरी यांच्याकडे पूर्णवेळ ग्रामसेवक मिळावा म्हणून पाठपुरावा केला. तरीही गावाला ग्रामसेवक मिळेना.

येथील सहा महिन्यांपासून ग्रामपंचायतींमधील विकास कामांचा निधी पडून आहे. येथील सरपंच, उपसरपंच, सदस्य हे देखील ग्रामस्थांकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांविषयी ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. तसेच सहा महिन्यापूर्वी सुरू झालेले कामही ग्रामस्थांच्या जिरवाजिरवीमुळे बंद पडले आहे. येथील प्रभारी ग्रामसेवक गाढे हे ग्रामस्थांचे फोनदेखील उचलायला तयार नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ पंचायत समिती कार्यालय, राहुरी येथे उपोषण करण्याच्या तयारीत आहेत.

तसेच तात्कालीन ग्रामसेवक लांबे यांच्यामागे ग्रामस्थांनी शासकीय ऑडिटचा ससेमिरा लावून दिला आहे. त्यामुळे येथील ग्रामपंचायत कार्यालय कर्मचारी क्वचितच उघडतात. त्यामुळे येथील ग्रामस्थ अक्षरशः हैराण झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या