Thursday, April 25, 2024
Homeधुळेधनगर आरक्षणातील ‘ड’ आणि ‘र ’ चा मुद्दा संपलाय

धनगर आरक्षणातील ‘ड’ आणि ‘र ’ चा मुद्दा संपलाय

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

धनगर या शब्दाचा अपभ्रंश करुन धनगड असे झाल्याने इतकी वर्ष समाजावर अन्याय होतो आहे. मात्र आपण याबाबतचे पुरावे सादर केल्याने ‘ड’ आणि ‘र’ चा वाद कधीच संपुष्टात आला आहे.

- Advertisement -

त्यामुळे आता आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. अन्यथा रस्त्यावर उतरु असे मत माजी मंत्री आण्णा डांगे यांनी आज पत्रपरिषदेत मांडले.

धनगर समाज महासंघांचे संस्थापक असलेले आण्णा डांगे हे आज राज्यव्यापी बैठकीच्या निमित्ताने धुळ्यात आले होते.

त्यादरम्यान त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, स्वातंत्र्य पूर्व काळापासून समाजावर अन्याय होतो आहे.

समाजात वेगवेगळे गट निर्माण होवून समाज विखुरला गेल्याने या मागणीला बळ येत नव्हते, म्हणूनच 17 ऑक्टोबर 1992 ला दसर्‍याच्या मुहुर्तावर जेजुरीत आपण धनगर समाज महासंघाची स्थापना केली.

एका छताखाली समाजाला आणण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजपच्या नेत्यांनी पैसे देवून आमच्यातलेच काही माणसे फोडून त्यांच्या गळाला लावलेत. मग त्यांनी पंढरपूर-बारामती मार्च चा घाट घातला.

खरेतर आरक्षणाच्या मागणीसाठी सरकार दरबारी, मंत्रालयासमोर किंवा दिल्लीत धडक द्यायला हवी. परंतु या मंडळींनी बारामतीत शरदचंद्र पवार यांच्या घरासमोर आंदोलन सुरु केले.

खरेतर या आंदोलनाला आम्ही विरोध केला, आंदोलन कर्त्यांना समजावले. परंतु त्यांचे बोलविते धनी वेगळे असल्याने ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

अखेर श्री.पवारांच्या घरासमोर झालेल्या चक्री उपोषणात दोन-अडीचशे वक्त्यांनी केलेल्या भाषणात श्री.पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरणे हा एककलमी कार्यक्रम राबविण्यात आला. यामुळेच आरक्षणाचा तोंडाशी आलेला घास गेल्याची खंत श्री.डांगे यांनी व्यक्त केली.

तरीही आरक्षणाबाबत गठीत झालेल्या वेगवेगळ्या समित्यांसमोर आपण वेळोवेळी पुरावे सादर केलेत. धनगरचा अपभ्रंश धनगड झाल्याने होणार्‍या अन्यायाची सत्यता पटवून दिली. आयोगाने देखील हे मान्य केले.

त्याचबरोबर गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेवून दीड तास सविस्तर चर्चा केली. त्यांनाही पुरावे दिलेत. मुख्यमंत्र्यांनी यावर अभ्यासासाठी थोडा वेळ मागीतला आहे. त्यामुळे वाट बघूया, तरही आरक्षण नाहीच मिळाले तर रस्त्यावर उतरु पण घटनेच्या आधारे आरक्षण मिळविल्याशिवाय राहणार नाही, असेही श्री.डांगे म्हणाले.

आम्हाला अनुसूचित जमातीतून वाटा नकोय. त्यामुळे आदिवासींचा आमच्याबद्दल झालेला गैरसमाज त्यांनी दूर करावा असे आवाहनही त्यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या