धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा; भाजप प्रदेशाध्यक्षांची मागणी

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. सदर तरुणीने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंडे आणि ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

“सामाजिक न्यायमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यानी आपल्या चुकीच्या कृत्यांबद्दल तात्काळ राजीनामा द्यायला हवा. मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही. भारतीय जनता पार्टीच्या महिला शाखेच्या वतीने एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, त्यामध्ये मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आम्हीही आता याविषयी आणखी जोरदार मागणी करणार आहोत. ज्या व्यक्तीवर अशा प्रकारचे आरोप होतात, त्याला या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नसतो. मात्र, गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरीक्षण करून मुंडेंचा राजीनामा घेतील, असं वाटतं नाही. तरीही मुंडे यांनी या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे,” अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात एका महिलेनं धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार अर्ज दिला होता. या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंनी खुलासा केला आहे. कालपासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. सदर प्रकरणी एका महिलेने स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो . हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे आहेत, असं खुलासा मुंडे यांनी केला आहे. एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *