मलाही विधान परिषदेची उमेदवारी द्या हो !

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपकडून उमेदवारीची पहिली मागणी नगरमधून झाली आहे. नगर महापालिकेचे काँग्रेसचे माजी नगरसेवक अ‍ॅड. धनंजय कृष्णा जाधव यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, जाधव हे सध्या स्वतःला भाजपचे कार्यकर्ते म्हणवतात. मात्र, शहराचे राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप व भाजपचे नगर दक्षिण मतदारसंघाचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्याशी त्यांचे विशेष सख्य असल्याचे सांगितले जाते. तसेच अ‍ॅड. जाधव यांच्या पत्नी सुप्रिया जाधव या काँग्रेसच्या नगरसेविका असून, महापालिकेत काँग्रेसच्या गट नेत्या आहेत. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर अ‍ॅड. जाधव यांनी भाजपकडे केलेली उमेदवारीची मागणी चर्चेची झाली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येत्या 30 जानेवारीला होणार आहे.

या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास उद्या गुरुवारपासून (दि. 5) सुरुवात होणार आहे. या मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आ. डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीनेही येवला येथील निवृत्त अधिकारी रतन बनसोडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर भाजपकडून महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे यांची उमेदवारी अपेक्षित मानली जात आहे.

या पार्श्वभूमीवर नगरमधून काँग्रेसचे माजी नगरसेवक अ‍ॅड. धनंजय जाधव यांनी भाजपकडून उमेदवारी मागून धमाका केला आहे. अर्थात खा. डॉ. सुजय विखे व आ. संग्राम जगताप यांच्या सल्ल्यानेच त्यांनी ही उमेदवारीची मागणी केली असावी, अशीही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळेच, त्यामागील कारण काय असावे, असाही चर्चेचा सूर आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *