घाटमाथ्यावर विकासकामांचा मुद्दाच ठरणार प्रभावी

बोलठाण । वार्ताहर Bolthan / Nandgaon

नांदगाव तालुक्यात 59 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावपातळीवरील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. घाटमाथ्यावरील राजकीयदृष्ट्या जागृत बोलठाण, जातेगाव, ढेकू, कुसुमतेल, रोहिले, गोंडेगाव, जवळकी या गावांमध्ये निवडणुकीचा ज्वर वाढला आहे. सत्तेचे केंद्र आपल्याकडेच राहावे यास्तव प्रस्थापित व्यूहरचना आखत असले तरी यंदा तरुणाई व नवीन उमेदवारांचे कडवे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहणार असून विकासकामांचा मुद्दाच प्रभावी ठरणार असल्याचे दिसून येत आहे.

घाटमाथ्यावरील बोलठाण व जातेगाव मोठ्या ग्रामपंचायत असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कुसुमतेल, ढेकू, जवळकी, गोंडेगाव, रोहिले या ग्रामपंचायतींची निवडणुकीमुळे गावातील वातावरण ढवळून निघाले आहे. गावोगावी फक्त निवडणूक विषयच सध्या चर्चेत आहे. विद्यमान सदस्य विकासकामांचे शिदोरी घेऊन पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करतील तर नवीन व प्रभागातील उमेदवार हे त्यांना कडवे आव्हान देतील असे चित्र सध्या दिसत आहे.

प्रस्थापित व गावातील स्थानिक पुढारी सत्ता आपल्याकडेच राहावी यासाठी राजकीय डावपेज आखण्यात व्यस्त झाले आहे. मात्र यंदा नवीन तरूणांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा पवित्रा घेतला आहे. प्रभागातील समस्या व विकासाची नवी दिशा सोशल मिडियाच्या माध्यमातून हे उच्चशिक्षित इच्छुक तरूण मांडत असल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. यंदा इच्छुकांची वाढलेली संख्या निवडणूक निकालावर प्रभाव टाकणारी ठरणार असल्याचे तुर्त दिसून येत आहे.

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या विकासाची संकल्पना घेत नवतरूण निवडणुकीच्या मैदानात उतरत आहे. त्यामुळे मैदानात कोण राहतो याचे चित्र 4 जानेवारी माघार झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. मागील 5 वर्षात गावात काय विकास झाला व किती झाला हे सर्वांना माहीत आहे. यामुळे वेळ देऊ शकेल व गावाच्या विकासाची खरी तळमळ असणार्‍यांनाच प्राधान्य क्रम राहील असा रागरंग घाटमाथ्यावर दिसून येत आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *