Wednesday, April 24, 2024
Homeनगरबंधारे तुडूंब भरल्याने देवकौठे झाले पाणीदार

बंधारे तुडूंब भरल्याने देवकौठे झाले पाणीदार

तळेगाव दिघे |वार्ताहर| talegav Dighe

संगमनेर तालुक्याच्या सरहद्दीवर असणार्‍या देवकौठे गावामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी

- Advertisement -

सातत्याने विविध विकास कामांसह अकरा सिमेंट बंधारे बांधले. भोजापूर धरणाच्या चारीचे पाणी व पावसाचे पाणी एकत्रित आल्याने देवकौठे येथील सर्व बंधारे तुडूंब भरल्याने सर्व शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

तळेगाव दिघे पट्ट्यातील देवकौठे हे गाव टोकावर असून या गावामध्ये कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसायातून मोठी आर्थिक क्रांती झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी याठिकाणी अनेक विकासाच्या योजना राबवल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात एक आदर्श गाव म्हणून देवकौठे गावाचा उल्लेख होतो.

शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सुबत्ता आलेल्या या गावांमध्ये नामदार बाळासाहेब थोरात यांच्या निधीतून अकरा सिमेंट बंधारे बांधण्यात आले. याचबरोबर नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या निधीतून दोन बंधार्‍यांची निर्मिती करण्यात आली. सध्या तळेगाव भागात चांगला पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी आहे.

निसर्गाच्या कृपेने यावर्षी या भागात खूप चांगला पाऊस झाला. थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून भोजापूर धरण पूरचारीचे पाणीही पिंपळे तलावामार्गे देवकौठेपर्यंत पोहोचले. पावसाचे पाणी व भोजापूर चारीचे पाणी एकत्रित आल्याने देवकौठेमधील सर्व बंधारे तुडूंब भरले आहेत.

तसेच सुमारे 14 वर्षांनी देवी नदीही वाहती झाली, त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे. मागील वर्षीही मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली भोजापूर चारीचे पाणी देवकौठे पर्यंत आले होते. याही वर्षी हे पाणी आणण्यासाठी मार्केट कमिटीचे संचालक भारत मुंगसे, तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष इंजि. सुभाषराव सांगळे, भागवतराव आरोटे, एकनाथ मुंगसे, राजेंद्र कहांडळ, अशोक मुंगसे, ज्ञानेश्वर मुंगसे, अण्णासाहेब शेवकर, नामदेव कहांडळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

थोरात कारखान्याच्यावतीने भोजापूर चारीचे पाणी तळेगाव पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असून दमदार पावसामुळे देवकौठेत आलेल्या मुबलक पाण्याने तुडूंब भरलेल्या बंधार्‍यांमुळे सर्वत्र हिरवाई पसरली असून विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

मंत्री थोरातांकडून आढावा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भोजापूर चारीचे पाणी निमोण, तळेगाव भागातील प्रत्येक गावात पोहचविण्यासाठी सातत्याने आढावा घेतला असून इंद्रजीत थोरात यांनीही पाठपुरावा केला. मंत्री थोरात यांच्याकडे राज्यात मोठी जबाबदारी असूनही पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या व्यापातूनही दररोज वेळ काढून ते कायम आढावा घेत असल्याचे संगमनेर तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष इंजि. सुभाषराव सांगळे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या