…तर आज ही वेळ आली नसती; फडणवीसांचा हल्लाबोल

jalgaon-digital
3 Min Read

मुंबई | Mumbai

सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून झालेल्या उचलबांगडीनंतर परमबीर सिंह यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपानंतर सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.

भाजपाने आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज(रविवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारपरिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील तत्काळ पत्रकारपरिषद घेत महाविकासआघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवारांची पत्रकारपरिषद मी पाहिली, ते म्हणाले की परमबीर सिंग यांची बदली होत असल्याने त्यांनी हा आरोप लावला. पण सुबोध जैस्वाल यांची तर बदली नव्हती, रश्मी शुक्ला यांची बदली नव्हती त्यांनी पुराव्याच्या आधारावर या सरकारकडे जो रिपोर्ट सादर केला होता. त्याचवेळी या संदर्भातील कारवाई झाली असती, तर मला असं वाटतं की आज ही वेळ या ठिकाणी आली नसती, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

तसेच, शरद पवार या सरकारचे निर्माते आहेत. त्यामुळे सरकारनं काहीही केलं तरीही त्यांना बचाव करावा लागतो. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंना परमबीर सिंग यांनी पुन्हा सेवेत घेतलं हे खरं आहे. पण हे अर्धसत्य आहे. शरद पवारांनी अर्धसत्य सांगितलं. परमबीर सिंग यांनी निर्णय घेतल्यानंतर ठाकरे सरकारनं आक्षेप का नोंदवला नाही? त्यावेळी सरकार झोपलं होतं का?,’ असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

दरम्यान परत सेवेत घेण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना कार्यकारी पद दिलं जात नाही. मुख्यमंत्री ठाकरे आणि गृहमंत्री देशमुख यांना नियम माहीत नाहीत का ? सरकारच्या आशीर्वादाशिवाय वाझेंना इतकं महत्त्वाचं पद मिळू शकत नाही, असा दावा त्यांनी केला.

त्याच बरोबर, गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतल्यशिवाय, याची चौकशी होऊच शकत नाही. गृहखाते कोण चालविते? अनिल देशमुख की अनिल परब? कारण, सभागृहात गृहविभागावर उत्तरं सभागृहात अनिल परब देतात. या नियुक्तांमध्ये नेमका हस्तक्षेप कुणाचा, हे स्पष्ट झालेच पाहिजे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सचिन वाझे जितक्या गाड्या वापरत होते, त्यापैकी काही गाड्या नेमके कोण-कोण व्यक्ती वापरत होते, हेही स्पष्ट झालं पाहिजे. एनआयए किंवा अन्य तपास यंत्रणांनी याची माहिती जनतेला दिली पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ज्युलिओ रिबेरो चांगले अधिकारी आहेत. हे हुशार आहेत. पण अनेक वर्षांपूर्वी निवृत्त झालेले डीजी रँकचे अधिकारी गृहमंत्र्यांची चौकशी कशी करणार? असा सवाल करतानाच केवळ परमबीर सिंग यांची चौकशी होणार आहे की देशमुख यांचीही चौकशी होणार आहे. त्याचा खुलासा पवारांनी करावा, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *